'रंगभूमी हे अभिनयाला सामर्थ्य देणारे माध्यम'

राज काझी
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाची मोहन जोशींची कारकीर्द नवनव्या उपक्रमांनी व मराठी रंगभूमीच्या हितासाठीच्या प्रयत्नांनी जेवढी बहरलेली दिसते, तितकीच ती अनेकदा विविध कारणांनी वादळीही ठरली आहे. याबद्दलच्या प्रश्‍नांनाही त्यांनी गप्पांमध्ये मनमोकळी उत्तरे दिली. आपले प्रयत्न नेहमीच प्रामाणिक होते, हे निक्षून सांगून त्यांनी येत्या निवडणुकीतून नव्या मंडळींच्या हाती सूत्रे सोपविण्याचे सूतोवाच केले. मोहन जोशींची ही एका प्रकारची निवृत्तीची घोषणा या क्षेत्रात नव्या अनेक घडामोडींना सुरवात करून देणारी आहे! 

पुणे - रंगभूमी हे अभिनेत्याची ताकद वाढवणारे माध्यम आहे. नवनव्या भूमिकांमधून अभिनयकलेचा कस लागतो व त्यातूनच नटाच्या अभिनयाचे सामर्थ्य वाढीस लागते. टीव्ही व चित्रपटांकडे जाऊ इच्छिणाऱ्या कलावंतांनी रंगभूमीवर पुरेसे धडे गिरवणे आवश्‍यक आहे. सशक्त अभिनेत्याची कारकीर्द दीर्घ असते. नाटकातील कलाकार इतर सर्व माध्यमांत लीलया वावरू शकतात. ज्येष्ठ अभिनेते व नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी हे मत व्यक्त केले. 

प्रतिष्ठेचा विष्णुदास भावे पुरस्कार यंदा मोहन जोशी यांना घोषित झाला आहे. "सकाळ'ने अभीष्टचिंतनासाठी आमंत्रित केलेल्या भेटीत त्यांनी रंगभूमीपासून महाराष्ट्रातल्या आजच्या सांस्कृतिक परिस्थितीपर्यंत अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. "हौशी किंवा प्रायोगिक अशा लेबलात व परिघात रंगकर्मींनी फार अडकून राहू नये, असाही सल्ला त्यांनी दिला. 

हौशी रंगभूमी ते हिंदी चित्रपटांची प्रदीर्घ कारकीर्द यामध्ये पुण्यातून गाठीस घेतलेल्या अनेक गोष्टींचा वाटा मोठा आहे. बापूराव विजापुरे यांनी दिलेली पहिली संधी, "मोरूची मावशी'साठीचे निरीक्षण व शिक्षण याचबरोबर यशवंत दत्त या आपल्या बलाढ्य प्रतिभेच्या सहकाऱ्याच्या आठवणींनांही त्यांनी उजाळा दिला. व्यावसायिक रंगभूमीवरील त्यांची वैभवी वाटचाल मात्र मुंबईत झाली. 

टीव्हीवरून थेट हिंदी चित्रपटांमधला त्यांचा प्रवेश अधिकारी बंधूंमुळे "भूकंप'मधून झाला आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. मात्र त्याच त्याच एकसुरी भूमिकांचा वीट येऊन त्यांनी हिंदी पडद्याला रामराम ठोकला, हेही त्यांनी खुलवून सांगितले. अमिताभ बच्चन यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त शुभेच्छा देताना ते म्हणाले, की माणूस म्हणूनही ते तेवढेच आदरणीय आहेत. 

मराठी नाटक व चित्रपटांत नव्या ऊर्जेचे नवनवे कसदार आविष्कार घडताना दिसत आहेत, हे आश्‍वासकच आहे. मात्र, शासनाकडूनही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राला जे सकारात्मक पाठबळ मिळणे आवश्‍यक आहे. त्याचा प्रचंड अभाव व अनास्था असल्याचे अत्यंत परखड मत त्यांनी नोंदवले.