‘ससून’मधील मातृदूध प्रकल्पावर ‘ब्रिटिश मेडिकल जर्नल’ची मोहोर

‘ससून’मधील मातृदूध प्रकल्पावर ‘ब्रिटिश मेडिकल जर्नल’ची मोहोर

पुणे - सरकारी रुग्णालयात मातृदूध पेढी यशस्वी चालविता येते आणि त्यातून नवजात बालकांचे प्राण वाचविता येतात, असा संदेश बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने जगाला दिला आहे. महाविद्यालयाने केलेल्या या अभिनव प्रयोगाबद्दल ‘ब्रिटिश मेडिकल जर्नल’तर्फे दक्षिण आशियातील आठ देशांच्या प्रतिनिधींसमोर महाविद्यालयाचा गौरव करण्यात आला.

‘ब्रिटिश मेडिकल जर्नल’तर्फे दक्षिण आशियायी देशांमधील अभिनव वैद्यकीय प्रयोग करणाऱ्या, तसेच वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, तसेच संस्थांना गौरविण्यात येते. त्यासाठी दक्षिण आशियातील आठ देशांमधून दहा विभागांतून दोन हजार नामांकन मागविण्यात आले होते. त्यातून निवडलेल्या अंतिम तीन नामांकनामधून माता व बाल आरोग्य या विभागातून बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाला ‘ब्रिटिश मेडिकल जर्नल’चा पुरस्कार मिळाला. दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात याचे वितरण झाले असून, बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. आरती किणीकर यांनी तो स्वीकारला.

डॉ. किणीकर म्हणाल्या, ‘‘सरकारी रुग्णालयांमध्ये मातृदूध पेढी ही संकल्पना नवीन आहे. आतापर्यंत खासगी रुग्णालयांपुरत्याच या पेढ्या मर्यादित होत्या; पण पुण्यात प्रथमच सरकारी रुग्णालयात मातृदूध पेढी सुरू करण्यात आली. त्यासाठी अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असे मातृदूध संकलन करणारे स्वतंत्र वाहन विकसित केले. ससून रुग्णालयासाठी महापालिकेच्या रुग्णालयांमधून मातेचे दूध संकलन करण्याची नवी व्यवस्था निर्माण झाली. त्यामुळे ‘ससून’मधील नवजात अर्भकांना मातेचे दूध मिळू लागले. त्याचबरोबर सोफोशमधील अनाथ बालकांनाही मातेचे दूध देणे शक्‍य झाले.’’ ब्रिटिश मेडिकल जर्नलच्या पुरस्कारामुळे सरकारी रुग्णालयात सुरू असलेला हा प्रयोग जगातील आठ देशांपुढे आला. त्याला जगाची मान्यता मिळाली, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

मातृदूध पेढी सुरू केल्याने पावडरपासून मिळणाऱ्या दुधाऐवजी बालकांना मातेचे दूध मिळू लागले. त्यामुळे अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या नवजात अर्भकांची प्रकृती वेगाने सुधारू लागली. त्यातून ससून रुग्णालयातील बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.
- डॉ. आरती किणीकर, प्रमुख, बालरोग विभाग

मातृदूध पेढी प्रकल्पामुळे मातांमध्ये स्तनपानाचे महत्त्व किती आहे, याबाबत जागृती झाली. बालरोग विभागाबरोबरच स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, परिचारिका, वॉर्ड सेवक, वाहनचालक या सर्वांचा यात सहभाग आहे. बॅंक ऑफ बडोदा आणि रोटरी क्‍लब ऑफ पूना यांच्या मदतीतून हा प्रकल्प साकारण्यात आला.
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

ससून रुग्णालयात गेल्या साडेतीन वर्षांमध्ये १५ हजार मातांनी केले दुग्धदान
आजारी किंवा कमी वजनाच्या १५ हजार ५०० बालकांना याचा लाभ
आतापर्यंत दोन हजार लिटर दूध संकलित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com