मुळा-मुठा जलवाहतुकीचा प्रस्ताव - शिरोळे

मुळा-मुठा जलवाहतुकीचा प्रस्ताव - शिरोळे

पुणे - केंद्र सरकारने आखलेल्या जलवाहतूक योजनेत पुण्यातील मुळा-मुठा नद्यांचा समावेश व्हावा, असा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत केंद्राकडे पाठविला आहे. दोन्ही सरकारांच्या भूमिकांमुळे प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होईल, असे खासदार अनिल शिरोळे यांनी रविवारी सांगितले. शहरातील सर्व प्रकल्प वेगाने मार्गी लावले जातील, असेही ते म्हणाले.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील महत्त्वाचे प्रश्‍न, त्याबाबतची कार्यवाही, परिणामांसदर्भात शिराळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते.

शिरोळे म्हणाले, 'जलवाहतुकीला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. ही योजना उपयुक्त ठरणार असल्याने पुण्यातील मुळा-मुठा नद्यांच्या समावेशाबाबतचा प्रस्ताव तयार करून तो सरकारकडे पाठविला आहे. या प्रस्तावांसर्भात राज्य सरकार अनुकूल असल्याने तो मंजूर होईल. शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प गेल्या साडेतीन वर्षांत मार्गी लावले आहेत. उर्वरित प्रकल्पांनाही लवकरच गती मिळणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या घोषणेनुसार प्रकल्पांची अंमलबजावणी होत आहे. त्यात, मुद्रा, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, जीवनज्योती आणि उज्ज्वला योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचल्या आहेत.'' कोथरूडमध्येच शिवसृष्टी होईल, असेही शिरोळे यांनी स्पष्ट केले.

गुजरातमध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता
'भारतीय जनता पक्षाची ताकद मोठी आहे. त्यामुळे गुजरातमध्ये भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार आहे. तेथील विकासकामे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यावर तेथील जनता भाजपला पाठिंबा देणार आहे. ते निकालातून दिसून येईल,'' असे सांगत शिरोळे यांनी गुजरातमध्ये भाजपचा विजय निश्‍चित असल्याचे सांगितले. मात्र, या विषयावर त्यांच्या पक्षाच्या एका खासदाराने केलेल्या भाकितावर बोलणे शिरोळे यांनी टाळले.

नदीसुधारसाठी आठवड्यात सल्लागार
मुळा-मुठा नदीसुधार योजनेच्या कामासाठी येत्या आठवडाभरात सल्लागार नेमण्याची प्रक्रिया होईल. त्याबाबची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे शिरोळे यांनी स्पष्ट केले. योजनेचे काम सुरू असताना अद्याप सल्लागारही नेमला जात नाही. केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांनी आदेश देऊनही ही कार्यववाही होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावर शिरोळे म्हणाले, 'नदीसुधार योजनेचे काम तातडीने सुरू करण्याबाबत बैठका झाल्या आहेत. त्यासाठी तातडीने सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्या संदर्भात महापालिकेशी चर्चा केली आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com