पश्‍चिम बाह्यवळण महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा 

पश्‍चिम बाह्यवळण महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा 

पुणे - मुंबई-बंगळूर पश्‍चिम बाह्यवळण महामार्गावर वारजे माळवाडी परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या परिसरातील मुठा नदी पूल, चौधरी सीएनजी पंपासमोर, माई मंगेशकर रुग्णालयासमोर, आरएमडी-सिंहगड महाविद्यालयासमोर, डुक्करखिंड, भुसारी कॉलनी टेकडी, वेदभवन फाटा आणि चांदणी चौक हा परिसर अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जात आहे. या ठिकाणी अपघातात नागरिकांचे बळी जात आहेत. या अपघातांमधील मृत्यूंना संबंधित विभागाच्या प्रमुखांना जबाबदार धरून कारवाई केली तरच हा प्रश्‍न मार्गी लागेल, अशी मागणी स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी केली आहे. 

वारजे माळवाडी परिसरात नागरीकरण वाढले आहे. नदी पूल परिसर वगळता महामार्गावर नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित मार्ग नाहीत. या महामार्गावर कात्रज ते चांदणी चौकादरम्यान बऱ्याच ठिकाणी प्रवाशी चढ-उतार करतात. महामार्ग ओलांडताना होणाऱ्या अपघाताची संख्या अधिक आहे. महामार्गावर मधूनच रस्ता ओलांडता येऊ नये, यासाठी उंच कठडे बांधण्याची गरज आहे. रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित मार्ग उभारणे गरजेचे आहे. येथील सहापदरी रस्ता आणि उड्डाण पुलाचे काम रखडलेले आहे. 

चांदणी चौकातील नव्याने उभारण्यात येणाऱ्या नवीन प्रकल्पाचे उद्‌घाटन झाले. पण कामाला अद्याप सुरवात झालेली नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. चांदणी चौक प्रकल्पासाठी जमीन अधिगृहीत करणे आणि वारजे माळवाडी येथील स्थानिक वाहतुकीसाठी डीपी रस्त्याची कामे पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या पातळीवर प्रयत्न होणे अपेक्षित आहे. तसेच, या महामार्गावर शहर वाहतूक पोलिसांकडून फिरती गस्त आणि भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना केल्यास अपघात रोखणे शक्‍य होईल. 

काही भागातील सद्य:स्थिती, त्रुटी आणि उपाययोजना : 
मुठा नदी पूल - 
महामार्ग पुलाची रुंदी चारपदरी 
पुलावरील पादचारी मार्गावरून दुचाकी ये-जा 
अपघाताने पुलाचे कठडे तुटलेले 
महामार्गालगत सेवा रस्ता नाही 
नदीच्या दोन्ही बाजू पालिकेच्या हद्दीत असूनही स्थानिक वाहतुकीला पूल नाही 

उपाययोजना 
महामार्गावरील सहापदरी करणे गरजेचे 
पादचारी मार्गावर दुचाकींना परवानगी 
सेवा रस्ता आणि पुलांची गरज 

चौधरी सीएनजी पंपासमोर 
उड्डाण पूल सहा पदरी, रस्ता मात्र चार पदरी 
प्रवाशी वाहनांमुळे रस्ता अरुंद 
महापालिकेचा डीपी रस्ता नाही 

उपाययोजना 
सहा पदरी रस्ता करणे 
प्रवाशी थांबा बंद करण्याची गरज 
पादचाऱ्यांनी महामार्ग ओलांडू नये, यासाठी उंच कठड्यांची गरज 

मंगेशकर रुग्णालयासमोर- 
पूर्वीच्या चौकामुळे महामार्ग ओलांडण्याचा प्रकार 
रात्री पथदिवे बंद असल्यामुळे रस्ता ओलांडणारे नागरिक दिसत नाही 
महामार्गावरील उड्डाण पुलाचे काम अद्याप रखडलेले 
पावसाळ्यात ओढ्याचे पाणी महामार्गावर 

उपाययोजना 
महापालिकेने डीपी रस्ता केल्याशिवाय उड्डाण पुलाचे काम सुरू करणे अशक्‍य 
पॉप्युलरनगर ओढा वळविण्यात आला असून तो सरळ करावा 
रात्री पथदिवे सुरू असणे आवश्‍यक 

आरएमडी-सिंहगड महाविद्यालयासमोर - 
सायंकाळी हिंजवडीहून येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त 
शेल पंपासमोर सेवा रस्त्याला अपघाताची शक्‍यता 

उपाययोजना 
ओढ्याच्या जुन्या पुलाखाली स्वच्छता करून पादचाऱ्यांसाठी वापरणे शक्‍य 
शेल पंपासमोर महामार्गावरून सेवा रस्त्यावर येणाऱ्या वाहनांवर वेग नियंत्रण असावे 

भुसारी कॉलनी टेकडी 
वळणावर वेग नियंत्रण होत नसल्याने अपघात 
ओढ्याचे पात्र बदलले असून, सेवा रस्त्यावर पावसाचे पाणी 
उपाययोजना 
धोकादायक वळणाचे फलक लावावेत 
गतिरोधक, वळणावर पांढरे पट्टे मारावेत तसेच सूचना फलक लावणे गरजेचे 

चांदनी चौक परिसर - 
पुलाखाली चारपदरी रस्ते 
नवीन पुलाचे भूमिपूजन पण काम रेंगाळलेलेच 
प्रकल्पासाठी जागा अद्याप ताब्यात नाहीत 
चांदणी चौक ते कोथरूडदरम्यान तीव्र उतार 
उपाययोजना 
प्रकल्पासाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया जलद व्हावी 
सेवा रस्त्यावर वेग नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक 
महामार्गावरून कोथरूडकडे येणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक पोलिस कर्मचारी नेमावेत 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com