कागदावरच निघतोय गाळ!!

कागदावरच निघतोय गाळ!!

सांडपाणी वाहिन्यांमधील गाळ न काढताच कोट्यवधी लाटले
पुणे - मैलापाणी वाहून नेण्याकरिता बांधलेल्या सांडपाणी वाहिन्यांमधील गाळ काढण्याच्या नावाखाली वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्‌टी केली जात असल्याचे आढळून आले आहे. या वाहिन्यांच्या रचनेमुळे गाळ साचत नसला, तरी केवळ कागदोपत्री गाळ काढल्याचे दाखवत नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार लाखो रुपये लाटत असून, स्वत:चे ‘उखळ पांढरे’ करण्यासाठी नगरसेवक मंडळीही ‘गाळ’ काढण्यालाच पसंती देत असल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणांपैकी उदाहरणादाखल बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचा कारभार पाहू. या कार्यालयाच्या हद्दीतील जेमतेम साडेसात किलोमीटर लांबीच्या वाहिनीतील गाळ काढण्यासाठी वर्षभरात तब्बल २५ लाख रुपये खर्च केला आहे. तर महापालिकेच्या धनोरी कळस (प्रभाग क्रमांक १) मधील काही भागांतील सांडपाणी वाहिन्यांच्या साफसफाईसाठी ६० लाख रुपये मंजूर केले आहेत. विशेष म्हणजे, ही रक्कम वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यात आले असून, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरीही मिळाली आहे.

गाळ साचतच नाही! 

शहर आणि उपनगरांमध्ये सुमारे २ हजार ४०० किलोमीटर लांबीच्या सांडपाणी वाहिन्यांचे जाळे आहे. साधारणत: २५ वर्षांपूर्वी या वाहिन्यांची बांधणी करण्यात आली असून, त्यात कुठेही गाळ साचणार नाही किंवा अन्य वस्तू अडकणार नाहीत, अशा पद्धतीने वाहिन्यांची रचना केली आली. वाहिन्यांमधून जाणाऱ्या पाण्याच्या दाबामुळे गाळ साचत नसल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र चार ते पाच वर्षांनी वाहिन्यांची देखभाल-दुरुस्ती अपेक्षित आहे. तरीही बहुतांशी प्रभागांमध्ये जेटिंग मशिनच्या साह्याने सहा-सहा महिने आणि दर वर्षाला वाहिन्यांमधील गाळ काढण्याची कामे केली जात आहेत. त्यासाठी लाखो रुपयांची तरतूद करून घेण्यासाठी नगरसेवक धडपडत असतात. ही कामे दिसत नसल्यानेच त्यासाठीचा निधी पदरात पाडून घेतला जातो, असे एका नगरसेवकाने सांगितले. 
 

काम न करताच बिले!

सांडपाणी वाहिन्यांच्या साफसफाईची कामे क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर केली जातात. त्यामुळे नेमकी कुठे आणि किती कामे झाली, याची कोणतीही माहिती महापालिकेच्या मुख्य इमारतीतील अधिकाऱ्यांना नाही. त्यामुळे त्या त्या प्रभाग समित्यांमधील नगरसेवक आणि क्षेत्रीय अधिकारी गाळ काढल्याचे दाखवून ठेकेदारांना बिले देत असल्याचे महापालिका प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सांगितले. तर सहकारनगरमधील नगरसेवक ही वस्तुस्थिती असल्याचे सांगत, वाहिन्यांमधील गाळ काढण्याची गरज नसते. त्यामुळे महत्त्वाची कामेच होत नाहीत, असेही ज्येष्ठ नगरसेवकाने सांगितले. क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत नेमक्‍या किती लांबीच्या सांडपाणी वाहिन्या आहेत. त्यांची कामे कधी करण्यात आली, याची कल्पनाही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना नसल्याचे जाणवले. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयाकडील कामे कागदोपत्रीच असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.    

मग वाहिन्या तुंबतात कशा?
सांडपाणी वाहिन्यांची साफसफाईसाठी महापालिका वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असली, तरी पावसाळ्यात वाहिन्या तुंबत असल्याचे दिसून आले. हीच परिस्थिती ओढे आणि नाल्यांचीही आहे. या कामासाठी यंदा सुमारे ९५ कोटी  रुपयांची तरतूद केली, त्यानुसार कामेही केल्याचा दावा प्रशासनाने केला. प्रत्यक्षात मात्र मोजक्‍याच भागांमध्ये नावापुरती कामे करून ठेकेदारांनी आपली बिले काढून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कामे झाली आहेत का? याची पाहणीही महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त कुणाल यांनी केली. परंतु त्यातून काहीही समोर आलेले नाही. 

देखभालही कागदपत्रीच?
शहरातील सांडपाणी वाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात वर्षाकाठी सुमारे १० ते १२ कोटी रुपयांची तरतूद केली जाते. त्यापैकी जेमतेम २५ टक्के निधीतून कामे होत असल्याचे सांगण्यात आले. उर्वरित निधी कागदोपत्री कामे दाखवून गायब केला जात असल्याचेही महापालिकेतील महत्त्वाच्या विभागातील एका कर्मचाऱ्याने सांगितले. त्याबाबतची उदाहरणेही दाखवता येईल, असेही त्यांनी सांगितले. 

शहरातील सांडपाणी वाहिन्यांची आश्‍यकतेनुसार साफसफाई केली जाते. त्यातील काही कामे मुख्य खात्याच्या आणि क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर केली जातात. क्षेत्रीय कार्यालयाकडून होणाऱ्या कामांची पाहणी करून बिले दिली जातात.
- विजय दहिभाते, उपायुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com