पालिका रुग्णालयांमध्ये ‘एनआयसीयू’ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

पुणे - महापालिका रुग्णालयांत पायाभूत सोयीसुविधांसह सुधारणा करण्याकरिता फिनोलेक्‍स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्यासोबत पुणे महापालिकेने करार केला आहे. त्यानुसार महापालिकेच्या महत्त्वाच्या रुग्णालयांतील पायाभूत सेवा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. 

पुणे - महापालिका रुग्णालयांत पायाभूत सोयीसुविधांसह सुधारणा करण्याकरिता फिनोलेक्‍स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्यासोबत पुणे महापालिकेने करार केला आहे. त्यानुसार महापालिकेच्या महत्त्वाच्या रुग्णालयांतील पायाभूत सेवा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. 

महापालिकेच्या राजीव गांधी हॉस्पिटल, सोनवणे हॉस्पिटल, दळवी हॉस्पिटल आणि कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये पायाभूत सोईसुविधांसह सुधारणा करण्याकरिता हा करार करण्यात आला. यात नवजात बालकांसाठीचे (एनआयसीयू) कक्ष अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज करण्यात येणार आहेत. या कराराच्यावेळी महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, आयुक्त कुणाल कुमार, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्‍वस्त व फिनोलेक्‍स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक रितू प्रकाश छाब्रिया, स्वतंत्र संचालक सीएसआर एफआयएल  एस. एस. धानोरकर आदी उपस्थित होते. 

महापालिका रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी ८ डॉक्‍टर्स आणि २९ परिचारिकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. ससून जनरल हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि भारती हॉस्पिटल यांसारख्या एनआयसीयू असलेल्या रुग्णालयांत कार्यरत असणारे डॉ. आरती किणीकर, डॉ. राजन जोशी आणि डॉ. प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येईल. रुग्णालयांमध्ये एनआयसीयू कार्यरत झाल्यानंतर नवजात बालकांसाठी तज्ज्ञ वैद्यकीय शुश्रूषा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल.

या वेळी छाब्रिया म्हणाल्या, ‘‘निओ-नॅटोलॉजी क्षेत्रात उत्तम सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. आपल्या पुणे शहरासाठी काम करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.’’

Web Title: pune news municipal hospital NICU