मुलाचा खून करणाऱ्यास जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

पुणे - अल्पवयीन मुलाचे अपहरण आणि खून करणाऱ्यास विशेष न्यायाधीश पी. सी. भगुरे यांनी जन्मठेप आणि एक लाख रुपये दंड ठोठावला. ही दंडाची रक्कम कारागृहातील श्रमाच्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशातून भरावी, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. या गुन्ह्यात आरोपीला मदत करणाऱ्या त्याच्या वडिलांनाही न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. 

वृषाल मधुकर काळाणे (वय 19), मधुकर सोपान काळाणे (वय 55, दोघे रा. भेकराईनगर, फुरसुंगी) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अजित बनकर (रा. भेकराईनगर) यांनी फिर्याद दिली होती. आरोपी वृषाल याच्याविरुद्ध फिर्यादींचा दहा वर्षाचा मुलगा ओम याचे अपहरण करून खून केल्याचा आरोप ठेवला होता. त्याचा मृतदेह बोपदेव घाटात टाकून पुरावा नष्ट केल्याच्या आरोपात वृषालचे वडील मधुकर यांना न्यायालयाने दोषी ठरविले. हा गुन्हा जुलै 2014 मध्ये घडला होता. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील विलास पठारे यांनी नऊ जणांची साक्ष नोंदविली. हडपसर ठाण्याच्या तत्कालीन पोलिस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांनी या प्रकरणाचा तपास केला. न्यायालयीन कामकाजात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बी. एस. लोखंडे, पोलिस हवालदार सी. एन. जाधव आणि ए. एस. गायकवाड यांनी साहाय्य केले.