निसर्गकवी हा शिक्का मारू नका! : ना. धों. महानोर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

"सकाळ'च्या "फेसबुक लाइव्ह'वर रंगला संवाद

"सकाळ'च्या "फेसबुक लाइव्ह'वर रंगला संवाद

पुणे :
या शेताने लळा लाविला असा असा की,
सुख-दु:खाला परस्परांशी हसलो-रडलो...
आता तर हा जीवच असा जखडला,
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो...

""कवितेतून एका बाजूला अत्यंत आनंदाची, पशू-पक्षांची, शेतकऱ्यांच्या सुखाची गोष्ट मांडली, तर दुसऱ्या बाजूला दुःखितांची, ओरबाडून टाकणाऱ्या काळोखाचीही गोष्ट मांडली आहे. त्यामुळे "निसर्गकवी' किंवा "रानकवी' हा एकच शिक्का माझ्यावर मारू नका. माझ्या इतर लेखनाचीही दखल घ्या.''
मनोगताला कवितेची जोड देत कविवर्य ना. धों. महानोर यांनी त्यांच्या चाहत्यांना भावनिक आवाहन केले.

"या नभाने ह्या भुईला दान द्यावे', "नभ उतरू आलं' अशा अनेक कवितांमधून वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या महानोर यांनी "सकाळ'च्या "फेसबुक लाइव्ह'वरून शनिवारी श्रोत्यांशी संवाद साधला. यानिमित्ताने शेतीवरील त्यांचे प्रेम, शेतकऱ्यांबद्दलचा कळवळा, त्यातून जन्माला येणारी त्यांची कविता, कवितेपासून गीतलेखनाकडे झालेला प्रवास, या प्रवासात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून मंगेशकर कुटुंबीयांपर्यंत अनेकांनी दिलेली दाद... याला उजाळा मिळाला. संगीतकार हर्षित अभिराज या वेळी उपस्थित होते.

महानोर म्हणाले, ""माझा "रानातल्या कविता' हा काव्यसंग्रह 1967 मध्ये आला. त्याला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. लेखनाला सुरवात करून 55 वर्षे झाली. शेती, पिके, खेडी, झाडे, दुष्काळ, त्यामुळे माणसांचे कोसळणे, पुन्हा नव्याने उभे राहणे हे सगळे माझ्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांसाठी दृष्टा, नवनिर्माता दुसरा कोणी नाही, असे माझे नेहमीच सांगणे असते.'' वडील मजूर होते. त्यांनी दिलेले संस्कार, आईचे जात्यावरचे दळणे आणि गावातील-शेतातील वातावरण यामुळे मी लिहू लागलो. पुढे उच्च शिक्षणासाठी शहरात गेलो; पण आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने वसतिगृहाचे शुल्कसुद्धा देता येत नव्हते. त्यामुळे परत गावाकडे आलो. तिथल्या वातावरणामुळे देशी शब्द, तिथली संस्कृती माझ्या कवितेत आली. जर मी पळसखेड्यात राहिलो नसलो तर माझ्यातला कवी तयार झाला नसता, असेही ते म्हणाले. या वेळी हर्षित अभिराज यांनी "दुरच्या रानात' हे महानोर यांचे गीत सादर करून मैफल खुलवली.

... म्हणून संमेलनाध्यक्ष पदापासून दूर
नाशिक येथे साहित्य संमेलनावेळी मला बिनविरोध संमेलनाध्यक्ष करण्यासाठी साहित्य महामंडळ आणि संलग्न संस्थांनी प्रयत्न केले होते. "फक्त अर्जावर स्वाक्षरी करा', असे त्यांचे म्हणणे होते; पण मी तिथून पळून गेलो, असे सांगून महानोर म्हणाले, ""इंदिरा संत, बा. भ. बोरकर, विंदा करंदीकर, दया पवार, शिवाजी सावंत, ग. ल. ठोकळ अशा कितीतरी मान्यवरांना संमेलनाध्यक्ष होता आले नाही. काहींचा निवडणुकीत पराभव झाला, तर पराभव झाला म्हणून काहींना मानसिक धक्कासुद्धा बसला. ही बाब माझ्या मनात खोलवर रुतून बसली आहे. महामंडळाची निवडणूक प्रक्रिया पारदर्शी नाही. त्यात अनेक त्रुटी आहेत. अशा कारणांमुळे मी निवडणुकीपासून दूर राहतो.'' महामंडळाने एक समिती स्थापन करून संमेलनाध्यक्ष निवडायला हवा, यावर महानोर यांनी भर दिला.

जवळीक असूनसुद्धा पवारांविरोधात बोललोय
माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या जवळचे, अशीही एक तुमची ओळख आहे, यावर बोलताना महानोर म्हणाले, ""कोणाशी जवळीक आली म्हणून लेखनात बाधा आली, असे माझ्याबाबतीत कधी घडले नाही. पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांनी मला दोन वेळा आमदार केले. शेतीमुळे त्यांच्याशी जवळीक झाली, तर कवितेमुळे यशवंतराव चव्हाणांशी. जवळीक असूनसुद्धा सभागृहात असताना पवारांच्या विरोधात मी बोललो आहे. आमच्यात भांडणेही झाली आहेत. "ठिबकचा निर्णय आत्ताच घ्या', हा आमचा मुद्दा होता तर "हा निर्णय नंतर घेऊ', असे पवार सांगायचे. दोघांची दृष्टी महाराष्ट्राच्या भल्याचीच होती. इतर पक्षाच्या मुख्यमंत्र्यांशी, नेत्यांशीही चांगले संबंध आहेत.''

Web Title: pune news n d mahanor facebook live in sakal