स्वातंत्र्य लढ्याची साक्ष देणाऱ्या मारुती मंदिराचा जीर्णोद्धार

मिलिंद संधान
सोमवार, 31 जुलै 2017

दापोडी : स्वातंत्रपूर्व काळातील घडामोडींचे केंद्र बिंदु ठरलेले मारूती मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.

दापोडी गावात मारूती मंदिराप्रमाणे शंकराचेही हेमाडपंथिय मंदिर आहे. काही वर्षापूर्वी करवीर पिठाचे जगतगुरू शंकराचार्य हे दापोडीत आले असता त्यांनी या शंकराच्या मंदिरात छत्रपती शिवाजीमहाराज दर्शन घेऊन गेल्याचे सांगितले.

नवी सांगवी : सव्वाशे वर्षांपेक्षा अधिक कालखंडातील स्वातंत्रपूर्व काळापासून ते आजतागायतच्या घडामोडींचा साक्षीदार असलेल्या  दापोडी मंदिराचा जिर्णोध्दार, मुर्तीप्राणप्रतिष्ठा व कलाशरोहण सोहळा नुकताच पार पडला. दाक्षिणात्य मंदिरांच्या कलाकुसरीने सजवून उभे राहिलेले हे मारूती मंदिर गावाच्या वैभवात भरच टाकत आहे. मारूतीचे मंदिर तसे कोणत्याही गावाला नवीन नाही परंतु पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी हे गाव स्वातंत्रपुर्व काळात स्वातंत्रसैनिकांचे हब होते. याच मंदिरात स्थानिक स्वातंत्र सैनिकांनी ब्रिटिशांच्या विरूध्द अनेक कटकारस्थाने रचली होते. याबाबत मंदिराचे विश्वस्त तानाजी काटे, विलास काटे, आबा किंडरे यांनी मंदिराच्या आठवणींना उजाळा दिला. 

भारतमातेच्या गळ्यातील पारतंत्र्याच्या बेड्या आपल्या भारतातील ज्या हजारो स्वातंत्रसैनिकांनी उखडून फेकल्या त्यापैकी तेरा स्वातंत्रसैनिक एकट्या दापोडी गावातील होते. धगधगत्या स्वातंत्र रणसंग्रमात जुलमी ब्रिटीश राजवटीच्या विरोधात अख्खा भारत पेटून उठलेला असताना याच दापोडी गावातील काटे, लुंकड, बाफणा, तिकोणे, शेख, जाधव, वाळुंजकर या घराण्यातील भूमीपुत्र हे याच मारूती मंदिरात बसून ब्रिटिशांच्या विरोधात कट रचत असत. वीसाव्या शतकाच्या आसपासचे हे मंदिर इतर गावांप्रमाणे होते. गावच्या जत्रा, उत्सवांचे नियोजन, बैठका येथे चालत होत्या. परंतु भारतमातेला पारतंत्र्याच्या बेडीतून मुक्त करण्यासाठी पेटून उठलेल्या स्वातंत्रसैनिकांनी चिंचवड येथील वीजेचा टॉवर उध्वस्त करण्यापासून ते रेल्वेचे रूळ उखडण्यापर्यंतचे कट या मंदिरात शिजले. हुतात्मा नारायण दाभाडे याने कॉग्रेसभवनावर झेंडा फटकाविला त्याचा कटही याच मंदिरात शिजला होता. त्यामुळेच दापोडीत त्याचा पुतळा उभारला आहे. 

मारूती मंदिर विश्वस्त व खजिनदार प्रकाश काटे म्हणाले, " ब्रिटिश कार्यकालात आमच्या गावात गव्हर्नर हाऊस होते. त्या काळात द फोर्ड नावाचा इंग्रज अधिकारी होता. त्याच्या नावावरून दापोडी हे नाव गावाला मिळाल्याची एक आख्यायीका आहे. ब्रिटिशांचे मोठे कँम्प या गावात भरत असत. सैनिक, घोडे, दारूगोळा मोठ्याप्रमाणावर येथे साठविला जात होता. "