आजपासून जागरण, दांडिया

आजपासून जागरण, दांडिया

पुणे - आश्‍विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर गुरुवारी (ता. २१) शरद ऋतूचे आगमन होत असून, शारदीय नवरात्रोत्सवासही सुरवात होत आहे. गरबा, दांडिया, जागरण गोंधळासहित सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेलही नऊ दिवस अनुभवायला मिळणार आहे. प्रतिपदेला (गुरुवारी) कुलाचाराप्रमाणे विड्याच्या पानांवर देव (देवांचे टाक) बसवायचे. देवापुढे विड्याचे पान, सुपारी अन्‌ दक्षिणा ठेवून घटस्थापना करायची म्हणून बुधवारी भरपावसातही भाविकांनी पूजा साहित्यासह घटस्थापनेचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केली होती.

महात्मा फुले मंडई, तुळशीबाग परिसर सकाळपासूनच नागरिकांच्या गर्दीने फुलून गेला होता, तर शहर व उपनगरांतील देवीच्या मंदिरांतही रात्री उशिरापर्यंत उत्सवाची तयारी सुरू होती. सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांचीही लगबग यानिमित्ताने पाहायला मिळाली. विशेषत्वाने खण-नारळासहित देवीची ओटी भरण्यासाठी हिरव्या साड्यांचे स्टॉल्स आणि दुकानेही मंदिरांच्या बाहेर थाटली आहेत. ग्रामदैवत तांबडी जोगेश्‍वरी, भवानीमाता मंदिर, चतुःशृंगी देवस्थान, संतोषीमाता मंदिर, तळजाईमाता मंदिर अशा विविध देवींच्या मंदिरांबाहेर उत्सवानिमित्ताने खासगी सुरक्षा रक्षकांसह स्वयंसेवकांच्या नियोजनात मंदिर प्रशासन व्यग्र होते. घरोघरीही नागरिक तयारी करत होते.

सोन्या-चांदीच्या देवीच्या मूर्तींची खरेदी, उजळवून घेतलेले देवी-देवतांचे टाक, तसेच नवीन तयार केलेले टाक सराफी पेढ्यांवरून नागरिक घरी घेऊन जात होते. उत्सवात नवरंगांच्या साड्या परिधान करण्याची विशेष आवड असते. त्यामुळे अनेकविध प्रकारच्या साड्यांनी दुकाने सजली आहेत. कार्यकर्त्यांमार्फत मंडळांच्या देवीसाठी तसेच, भाविकांकडूनही घरच्या तांदळ्यासाठी चांदीचे मुखवटे करून घेण्याची प्रथा आहे. कुलदैवतेच्या तांदळ्याला प्रामुख्याने माहुरची रेणुका, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, वणीची सप्तशृंगी (साडेतीन शक्तिपीठे) देवीच्या मुखवट्यासहित टाकही करून घेत असल्याचे सराफी व्यावसायिकांनी सांगितले.

विक्रेत्या मदिना तांबोळी म्हणाल्या, ‘‘नवरात्रामध्ये विड्याच्या पानांवर देव बसविण्याची प्रथा आहे. घटावरील कलश व पान-सुपारीवर ठेवण्यासाठी विड्याच्या पानांची माळ करतात, त्यामुळे त्यांना सर्वाधिक मागणी असते. निंबगाव-केतकी, सांगली, सातारा, बनारस व कोलकता येथून ही पाने येतात. २५, ५० आणि १०० पानांची खरेदी घरगुती पूजेसाठी केली जाते. देवस्थानांकडूनही पानांना मागणी असते.’’ 

विक्रेत्या संगीता काळभोर म्हणाल्या, ‘‘घट (सुगडे), लाल रंगाचे रेशमी वस्त्र, परडी, वावरी (काळी माती), नऊ प्रकारचे धान्य, नाडा, फळांचा वाटा आदी साहित्याची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते.’’

कुलाचाराप्रमाणे देवादिकांची पूजा करावी. उत्सवात विड्याच्या पानांवर देव बसविण्याची, तसेच अखंड नंदादीप लावण्याची पद्धत काही कुटुंबीयांमध्ये असते. देवघराला आंब्याच्या डहाळीचे तोरण लावावे. सूर्योदयापासून माध्यान्ह काळापर्यंत घटस्थापना करावी. आश्‍विन पंचमीला रविवारी (ता. २४) ललिता पंचमी पूजन करावे, तर २७ सप्टेंबरला महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) करावे.
- मोहन दाते, पंचांगकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com