भाजपविरोधात राष्ट्रवादीचे "जाबनामा' आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

पुणे - निवडणुकीपूर्वी विकासाचे ढोल बडवून सत्ता ताब्यात घेतलेल्या भारतीय जनता पक्षाला आता शहरविकासाचे सोयरसुतक राहिलेले नसल्याचा आरोप करीत, प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला गेल्या सहा महिन्यांच्या कारभाराचा जाब विचारला. पुणेकरांची दिशाभूल करून सत्तेचा गैरवापर केल्यास आक्रमक होण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी भाजपला दिला आहे. 

महापालिकेत सत्तेत येऊन भाजपला गुरुवारी सहा महिने पूर्ण झाले. या कालावधीत पुणेकरांचे प्रश्‍न सोडविण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश असल्याचे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रसने शुक्रवारी महापालिकेच्या दारात "जाबनामा' आंदोलन केले. पक्षाच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण, महापलिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, माजी महापौर चंचला कोद्रे, नगरसेवक सुभाष जगताप, सचिन दोडके, प्रकाश कदम, महेंद्र पठारे, भैयासाहेब जाधव, योगेश ससाणे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक आणि पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. भाजपच्या मनमानी कारभाराविरोधात या वेळी घोषणाबाजी करण्यात आली. मेट्रोच्या कामाला गती का नाही, नदी सुधार योजनेचे काय झाले, आरोग्य विभागाचा कारभार का सुधारला जात नाही, आदी प्रश्‍नही आंदोलनकर्त्यांनी मांडले. 

चव्हाण म्हणाल्या, ""शहराचा विकास करण्याचे स्वप्न पुणेकरांना दाखवून भाजपने सत्ता मिळविली. परंतु, पहिल्यांदाच सत्ता मिळाल्याने कामे करण्याचा अनुभव नसलेले भाजपचे पदाधिकारी निष्क्रिय ठरले आहेत. केंद्र आणि राज्यातही त्यांची सत्ता असूनही पुण्याच्या विकासाच्या योजना सोडविता आलेल्या नाहीत. ज्या योजना राबविल्या जात आहेत, त्यांत पारदर्शकता नाही. साधा कचऱ्याचाही प्रश्‍न मार्गी लागलेला नाही,'' 

तुपे म्हणाले, ""पुणेकरांचा विश्‍वास जिंकून भाजपचे काही नेते ठेकेदारी करीत आहेत. राज्यातील मोठ-मोठी कामे मिळविण्याची धडपड ते करीत आहेत. शिक्षण मंडळाची पुनर्रचना झालेली नाही. पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सुविधा बंद केली आहे. पुणेकरांच्या हिताचे निर्णय न घेणे हाच भाजपचा कारभार आहे.'' 

Web Title: pune news NCP