"राष्ट्रवादी'च्या महिलांनी केला चुलीवर स्वयंपाक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

पुणे - दसरा आणि दिवाळीचा मुहूर्त साधून केंद्र, राज्य सरकार सामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत लोटत असल्याचे सांगत, महागाईचा निषेध म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर चुलीवर स्वयंपाक केला. बापट यांच्याकरिता भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा असलेले ताट भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे दिले. केंद्राऐवजी राज्य सरकारने सणासुदीत नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी केली. 

स्वस्त धान्य दुकानांमधून दारिद्य्ररेषेखाली (बीपीएल) शिधापत्रिकाधारकांना सवलतीत मिळणारी साखर बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, अंत्योदय योजनेंतर्गत साखरेच्या भावात पाच रुपयांची वाढ केली आहे. शिवाय, गॅसच्या दरात सतत वाढ होत असल्याच्या निषेधार्थ पक्षाच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. नगरसेविका वैशाली बनकर, रत्नप्रभा जगताप, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, अनिस सुंडके, रवींद्र माळवदकर, नंदिनी पानेकर, नीता गलांडे, अर्चना चंदनशिवे, ऊर्मिला गायकवाड यांच्यासह पक्षाच्या महिला कार्यकर्त्या यात सहभागी झाल्या होत्या. 

चव्हाण म्हणाल्या, ""केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयामुळे महागाईचा आलेख वाढतो आहेत. सणासुदीच्या काळात पुन्हा महागाई वाढले, अशा पद्धतीचे 

निर्णय घेतले जात आहेत. "बीपीएल'च्या शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरातील साखर बंद केली आहे. त्यामुळे गरिबांनी दिवाळीसारखे सण कसे साजरे 
करायचे?'' 

चाकणकर म्हणाल्या, ""स्वयंपाकाचा गॅस आणि अन्य वस्तूंच्या दरात वाढ होत आहे. सवलतीत साखर मिळत असल्याने गरिबांची दिवाळी गोड होते, पण भांडवलदारांचे हित जपणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारने गरिबांना महागाईच्या खाईत लोटले आहे. सरकारच्या अशा निर्णयाला विरोध राहील.''