सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृतीची गरज 

अनिल सावळे 
शुक्रवार, 23 जून 2017

कठोर शिक्षेची तरतूद - 
- सोशल मीडियावर बनावट अकाउंट सुरू करणे, आक्षेपार्ह अथवा अश्‍लील मजकूर पाठविणे, भावना दुखावणे, तसेच भावना चाळविणारे अश्‍लील साहित्य प्रसारित करणे अशा गुन्ह्यांत तीन ते पाच वर्षे कैद आणि तीन लाख रुपये दंडाची तरतूद आहे. 

शाळा-महाविद्यालय आणि नोकरीच्या ठिकाणी आपसांतील मतभेद तसेच मैत्रींमधील दुराव्यातून सोशल मीडियावर बदनामी करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पुण्यातील सायबर गुन्हे शाखेकडे आलेल्या तक्रारींवरून ही धक्‍कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांमध्ये तर, आस्थापना प्रमुखांनी पोलिसांच्या मदतीने कर्मचाऱ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जागृती करण्याची गरज आहे. 

महाविद्यालयीन तरुण-तरुणींमध्ये मैत्रीचे नाते तुटल्यास अथवा प्रेमभंगातून प्रतिमा मलिन करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. काहीजण मुद्दामहून मित्र-मैत्रिणींना त्रास देण्यासाठी सोशल मीडियावर बदनामी करीत असल्याच्या घटना समोर येत आहेत. सायबर गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात न घेतल्यामुळे काही विद्यार्थी आणि तरुणांवर करिअर उद्‌ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. बहुतांश गुन्हे ओळखीच्या व्यक्‍तीकडूनच केले जातात. विद्यार्थी आणि पालकांनी वेळीच खबरदारी घेतल्यास त्याचे दुष्परिणाम टाळता येतील. 

सायबर गुन्ह्यांच्या काही प्रातिनिधिक घटना... 
1) एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका तरुण-तरुणीचे प्रेम जुळले. काही महिने सोबत घालविल्यानंतर त्यांनी स्वत:चे व्हिडिओ काढले. नंतर मुलीने जातीमुळे लग्नास नकार दिला. त्या तरुणीचा दुसऱ्यासोबत विवाह झाला. त्यामुळे त्याने चिडून तो व्हिडिओ अश्‍लील संकेतस्थळावर अपलोड केला. तसेच, तिच्या पतीलाही कळविले. याप्रकरणी त्या दाम्पत्याने सायबर पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दिली आहे. 

2) स्वारगेट परिसरातील एका सोसायटीतील सातवीच्या वर्गातील मुलाने अकरावीत शिकणाऱ्या मुलीचे फेसबुकवर बनावट अकाउंट सुरू केले. त्या मुलीचे व्हॉटसऍपवरील छायाचित्र कॉपी करून फेसबुकवर टाकले. तिच्याशी अश्‍लील चॅटिंग सुरू केले. हा प्रकार त्या मुलानेच केला असावा, असा संशय आल्यावर मुलीच्या आईने स्वारगेट पोलिस ठाणे गाठले. अखेर हे प्रकरण सायबर गुन्हे शाखेत पोचले. पोलिसांनी मुलगा अल्पवयीन असल्यामुळे पुन्हा असे करणार नसल्याच्या अटीवर त्याला समज देऊन सोडून दिले. मात्र, या घटनेमुळे मुलासह कुटुंबाला तेथून घर बदलण्याची वेळ आली. 

3) हिंजवडी येथील आयटी कंपनीत मुलाखतीसाठी तरुणी गेली होती. तिने तेथे नोकरीचा अर्ज भरून दिला. दुसऱ्या दिवसापासून तिला मोबाईलवर अश्‍लील फोन येण्यास सुरवात झाली. त्या मुलीने तिच्या आजीला हा प्रकार सांगितला. त्यावर आजीने लॅंडलाइन फोनवरून त्या मुलाला खडसावले. पण त्या मुलाने आजीलाही अश्‍लील फोन करून त्रास देण्यास सुरवात केली. मुलीने सायबर गुन्हे शाखेत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. त्यावेळी तो तरुण नागपूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत सायबर पोलिसांनी नागपूर पोलिसांना कळविले आहे. 

4) एका तरुणाने फेसबुकवर तरुणीच्या नावे बनावट अकाउंट सुरू केले. तिच्या प्रोफाईलवर अभिनेत्रीचे छायाचित्र लावले. तसेच, स्टेटसमध्ये ती "यंगेज' असल्याचे दाखविले. ही बाब मुलीला माहीत नव्हती. तिला लग्नाचे स्थळ आल्यानंतर मुलाच्या भावाने फेसबुकवरून तिची माहिती काढली. तेव्हा मुलीचे स्टेट्‌स "यंगेज' पाहून त्याने हा प्रकार भावाला सांगितला. त्यामुळे तरुणीचे लग्न मोडले. त्या तरुणीने तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

पुणे शहरात फेसबुक, ट्‌विटर, इन्स्ट्राग्राम या सोशल मीडियाचा वापर करून सायबर गुन्हे करण्याचे प्रमाण एकूण सायबर गुन्ह्यांच्या तुलनेत 25 टक्‍के इतके आहे. त्यामध्ये सर्वाधिक 22 टक्‍के फेसबुक, एक टक्‍का ट्‌विटर आणि अन्य सोशल मीडियाचे प्रमाण दोन टक्‍के इतके आहे. 
- फेसबुकवर मैत्रीच्या बहाण्याने 40 हून अधिक गुन्हे. महिलांची फसवणूक होण्याचे प्रमाण अधिक. 

- मोबाईलवर व्हॉटस्‌ऍपच्या माध्यमातून 101 गुन्हे 
- एकूण अर्जांच्या तुलनेत प्रमाण 4.96 टक्‍के 

- नागरिकांनी घ्यावयाची दक्षता.... 
- फेसबुकवर भेटलेल्या मित्र-मैत्रिणींसोबत संभाषण करताना खबरदारी घ्यावी. 
- ओळख असलेल्या व्यक्‍तींचीच फ्रेंड रिक्‍वेस्ट स्वीकारावी. 
- स्वतःची वैयक्‍तिक माहिती तसेच, मित्र-मैत्रिणींची माहिती पाठवू नये. 
- आक्षेपार्ह संदेश पाठवू नयेत. चॅटिंग करताना खबरदारी घ्यावी. 
- फेसबुकवर अनोळखी व्यक्‍तींना स्वतःचे आणि कुटुंबीयांचे छायाचित्र पाठवू नये. 
- पासवर्ड कोणालाही देऊ नये. 
- महापुरूषांबाबत किंवा जातीय तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह संदेश डिलीट करावेत. ते फॉरवर्ड करू नयेत. 
- एखादी पोस्ट टाकताना विचार करूनच टाकावी. 
- मॅट्रिमोनिअल संकेतस्थळावर ओळख झाल्यानंतर पालकांद्वारेच संपर्क साधावा. 
- अश्‍लील मजकूर प्राप्त झाल्यास पोलिस ठाण्यात संपर्क साधा.