देशाच्या रक्षणासाठी मजबूत नीती हवी - डी. एस. हुडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

पुणे - ‘‘काश्‍मिरी नागरिक भारतविरोधी नाहीत, तर ते यंत्रणेमुळे त्रस्त झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या देशविरोधी, सैन्यविरोधी ‘कॅम्पेन’मुळे काश्‍मिरी तरुणांमध्ये भारतविरोधी भावना निर्माण केली जात आहे, त्यांना हिंसेसाठी चिथवले जात आहे. अशा देशविरोधी मोहिमेला रोखण्यासाठी मजबूत नीतीची आवश्‍यकता आहे,’’ असे मत लष्कराच्या उत्तर विभागाचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा (निवृत्त) यांनी सोमवारी व्यक्त केले.   

सरहद संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात हुडा यांनी ‘काश्‍मीर प्रश्‍न’ या विषयावर मार्गदर्शन केले. ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले, संस्थेचे संस्थापक संजय नहार, युवराज शाह, जाहिद भट उपस्थित होते. 

हुडा म्हणाले, ‘‘काश्‍मीरमध्ये २००८ ते २०१३ या काळात शांततापूर्ण वातावरण होते. त्या वेळी तेथील विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक होते. मात्र, यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने, सैन्यदलाने प्रयत्न केले नाहीत, ही एक चूकच म्हणावी लागेल.’’

सध्या काश्‍मिरी तरुणांकडून होणाऱ्या दगडफेकीला मुद्दामहून वाढीव पद्धतीने सादर केले जात आहे. त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच, दगडफेक लष्करावरील रागातून नव्हे, तर यंत्रणेवरील रागामुळे होत आहे. मात्र, देशातील नागरिकांचा काश्‍मीरमधील तरुणांबद्दलचा दृष्टिकोन दूषित होता कामा नये, असेही त्यांनी सांगितले.

गोखले म्हणाले, ‘‘काश्‍मीरमधील तरुणांना पाकिस्तानमध्ये जाण्यात अजिबात रस नाही. मात्र, प्रत्येक गोष्टीत लष्कराचा हस्तक्षेप, काश्‍मिरी नागरिकांवरील राजकीय अविश्‍वास, राजकीय आणि सामाजिक संवादाची कमतरता, यामुळे असंतोष निर्माण झाला आहे.’’ 

असा सुटू शकतो काश्‍मीर प्रश्‍न
केवळ काश्‍मीरवर लक्ष केंद्रित न करता काश्‍मीर, जम्मू आणि लडाख या तिन्ही प्रदेशांना समान पातळीवर हाताळले पाहिजे 
पर्यटनवृद्धीसाठी विविध भागांचा विकास गरजेचा
तरुणांसाठी शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्‍यक