विद्यापीठाला मिळणार नवे प्रवेशद्वार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी विद्यापीठाने पाऊल टाकले आहे. हे प्रवेशद्वार ब्रेमेन चौकाच्या दिशेने सुमारे दोन किलोमीटर पुढे हलविण्यात येणार आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी विद्यापीठाने पाऊल टाकले आहे. हे प्रवेशद्वार ब्रेमेन चौकाच्या दिशेने सुमारे दोन किलोमीटर पुढे हलविण्यात येणार आहे.

विद्यापीठाने त्यासाठी बृहत आराखडा तयार केला आहे. या चौकात तीन रस्ते एकत्र येतात. तेथे उड्‌डाणपूल असला, तरी अनेकदा वाहतूक कोंडी होते. सकाळच्या वेळी विद्यापीठाकडे वळण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांना बंदी घातली जाते. यामुळे चतु:शृंगी पोलिस ठाण्याच्या जवळ जाऊन नागरिकांना पुन्हा विद्यापीठाच्या दिशेने वळावे लागते. हा प्रश्‍न कायमचा सोडविण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार ब्रेमेन चौकाच्या दिशेने "कोठी गेट'जवळ नव्याने बांधण्यात येणार आहे.

विद्यापीठाचे मुख्य अभियंता आर. व्ही. पाटील म्हणाले, ""नव्या प्रवेशद्वाराकडे शिवाजीनगरकडून पोचल्यानंतर विद्यापीठाकडे वळण्यासाठी भुयारी मार्ग केला जाणार आहे. विद्यापीठातून बाहेर पडताना उजवीकडे वळण्यासाठी उड्डाण पूल आणि डावीकडे म्हणजे शिवाजीनगरच्या दिशेने वळण्यासाठी वेगळा पूल असेल. त्याचा आराखडा तयार झाला आहे. या बदलासाठी महापालिकेबरोबर चर्चा सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.''

मुख्य प्रवेशद्वाराजवळ सध्या मेट्रोचे स्थानकही नियोजित आहे. तसेच सध्या चौकातून विद्यापीठाकडे वळण्याचा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वार हलविण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाल्यानंतर जुने मुख्य प्रवेशद्वार हे केवळ पादचाऱ्यांसाठी खुले राहील. नव्या प्रवेशद्वारासाठी विद्यापीठाच्या कर्मचारी निवासाची इमारतही हटवावी लागणार आहे; परंतु यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटण्यास मदत होईल.
-आर. व्ही. पाटील, मुख्य अभियंता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: pune news new gate for pune university