लेझरचे प्रयोग पहाताना हरखून गेला शिक्षकवर्ग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018


सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी विज्ञान व गणित विषयांमध्ये चांगले गुण मिळवितात परंतु त्यांना या विषयांमध्ये रूची नसून परिक्षेसाठी अभ्यास केला जातो. शिक्षकांनी वर्गामध्ये कृतियुक्त शिक्षणावर भर दिला पाहिजे. वर्गात विविध प्रात्यक्षिक करून दाखविली पाहिजेत त्यामुळे त्या विषयांची आवड निर्माण होण्यास मदत मिळेल.
- प्रा. एल. एस. शशिधर; जेष्ठ वैज्ञानिक व विज्ञान प्रसारक आयसर, पुणे

पुणे: "लेझर च्या किरणांनी फुटणारे रंगी बेरंगी फुगे, प्रकाशकिरणे, रंगीत सावल्यांची निर्मिती, इंद्रधनुष्य, ग्रहणांची निर्मिती, चंद्राच्या कला इत्यादी प्रयोग पहाताना विद्यार्थ्यांसारख्या टाळ्या, आश्‍चर्य व आनंद या भावविश्‍वात शिक्षकवर्ग हरखून गेला होता. निमित्त होते खास विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान व गणित शिक्षक कार्यशाळेचे.

सकाळ माध्यम समूहाच्या सकाळ एनआयई (न्यूजपेपर इन एज्युकेशन) व सेंटर ऑफ एक्‍सलन्स इन सायन्स ऍन्ड मॅथेमॅटिक्‍स एज्युकेशन, आयसर पुणे यांचे वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित एकदिवशीय विज्ञान व गणित शिक्षक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पुणे, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यासह, श्रीगोंदा, इचलकरंजी या विभागातील गणित व विज्ञान शिक्षकांचा सहभाग राहिला. या कार्यशाळेत पाचवी ते दहावीमधील प्रकाशशास्त्राचे प्रयोग, मानवी डोळ्यांमधील दोष कसे काढतात. प्रतिमांची निर्मिती या प्रयोगांची माहिती प्रात्यक्षिकासह देण्यात आली. या कार्यशाळेत प्रा. श्रीनिवास होथा यांनी अनुसंरचना व आवर्तसारणी, प्रयोगांच्या माध्यमातून रसायनशास्त्राची ओळख यावर दृकश्राव्यासह माहिती दिली.

शांती पिसे यांनी गणितातील विविध संकल्पना कोडी व प्रत्यक्ष कृतीतून विशद केल्या यामध्ये त्रिकोणाची रचना, क्षेत्रफळ यांचा समावेश होता. चौकटीच्या बाहेर जावून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी कशी निर्माण करता येईल यावर त्यांनी मार्गदर्शन केले. अशोक रूपनेर यांनी भौतिकशास्त्राच्या संकल्पना प्रात्यक्षिकासह विशद करताना भिंग व आरशांचा वापर करीत प्रतिमेची निर्मिती, चंद्राच्या विविध कला, सावली कशी तयार होते. पूर्ण आंतरिक परावर्तन, गुणित प्रतिमा, ग्रहण, दृष्टीसातत्य यांची माहिती दिली. चैतन्य मुंगी यांनी जीवशास्त्रामधील विविध प्रयोग, मानवी सांध्याची रचना, मानवी शरिरामध्ये उत्क्रांतीचे पुरावे, पचन संस्थेचे कार्य, निसर्गाचे अनुकूलन यांची माहिती दिली. डॉ. अपर्णा देशपांडे यांनी स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप चे कार्य, अणू रचना प्रत्यक्ष कशी पहाता येईल याची माहिती दिली. डॉ. अपूर्वा बर्वे, विठ्ठल शेजवळ, शितल बोरीवार, सुनिता पाटोळे, अक्षया केळसकर यांचे विशेष सहकार्य मिळाले. प्रास्ताविकात विशाल सराफ यांनी सहभागी शिक्षकांना "सकाळ एनआयई' उपक्रमाची माहिती दिली.

उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी...
सकाळ एनआयई (न्यूजपेपर इन एज्युकेशन) या शालेय उपक्रमाची शैक्षणिक वर्ष 2018-19 ची सभासद नोंदणी सुरू होत असून शैक्षणिक वर्षात 18 विशेषांकासह विविध मान्यवर वक्‍त्यांच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात. विद्यार्थ्यांच्या वाचन व लेखन कौशल्याला वाव मिळावा या हेतूने हा उपक्रम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये राबविला जात आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी विशाल सराफ- 9922913473 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: pune news nie teacher laser show