पुणे ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर : नितीन गडकरी

Nitin Gadkari
Nitin Gadkari

पुणे : मुळा - मुठा आणि मुळा- प्रवरा नदीतून राज्य सरकारने परवानगी दिली तर जलवाहतुकीचा प्रकल्प साकारता येईल, त्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याची ग्वाही केंद्रीय रस्ते विकास वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (ता. 27) येथे दिली. तसेच याच नदीतून हवाई वाहतुकीचा पथदर्शी प्रकल्पही राबविण्यास केंद्र सरकार इच्छूक आहे. पुणे रेल्वे स्थानकालगत "ड्राय पोर्ट' बांधल्यास रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होऊ शकतो, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. 

चांदणी चौकातील नियोजित उड्डाण पुलाचे भूमिपूजन गडकरी यांनी डिजिटल पद्धतीने केले. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार, आमदार, महापालिकेचे पदाधिकारी, महामार्ग विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. उद्‌घाटनानंतर बोलताना गडकरी यांनी वाहतूक क्षेत्रातील नवे प्रयोग, केंद्र सरकार त्यासाठी करीत असलेल्या उपाययोजना, राज्यातील रस्त्यांचा विकास आणि आढावा घेतला. सुमारे 35 मिनिटांच्या भाषणात त्यांनी महामार्ग आणि अनुषंगिक सुधारणांची माहिती दिली. 

गडकरी म्हणाले, "चांदणी चौकातील नियोजित उड्डाण पुलाचा आराखडा "आयआयटी' मुंबईकडून तयार करून घेतला. तज्ज्ञ संस्थांकडून तपासून घेतला. पुढच्या 25 वर्षांचा विचार करून हा आराखडा तयार केला आहे. ऑटोमोबाईल सेक्‍टरची वाढ 22 टक्‍क्‍यांनी होत आहे. त्यामुळे पुणे वाहनांच्या संख्येच्या ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर आहे. प्रदूषण किती वाढते आहे, त्याची पुणेकरांना जाणीव नाही. नद्यांच्या राष्ट्रीय विधेयकात मुळा-मुठाचा समावेश करा म्हटले होते; परंतु राहून गेले. देशातील 111 नद्यांचे जलमार्गात रूपांतर करण्याची योजना केंद्र सरकारने हाती घेतली आहे. राज्य सरकारने परवानगी दिल्यास त्यात मुळा- मुठा आणि मुळा प्रवरा नद्यांचाही समावेश करू.'' 

"पाण्यावर उतरणारी विमाने जपानमधून या महिन्यात येणार आहेत. त्या बाबतचा प्रकल्प पुण्यात राबविण्याची इच्छा आहे. त्यातून मुळा-मुठा नदीतूनही शिर्डीला जाणे शक्‍य होऊ शकते. तंत्रज्ञानाचा वापर करून हवेतून वाहतूक करण्याचा पथदर्शी प्रकल्प वाराणसी, नागपूर, दिल्लीसह पुण्यात राबवण्याचा विचार आहे,'' असे गडकरी यांनी सांगितले. 

"पुण्यातील विमानतळाचा प्रश्‍न मार्गी लावला आहे. पुण्यातील मेट्रोचे काम नागपूरपेक्षा चांगले होईल. कारण नागपूरमध्ये जर्मन, फ्रेंच वास्तूविशारदांची स्थानके उभारण्यासाठी मदत घेतली होती. तेच लोक आता पुण्यातही काम करणार आहेत. त्यामुळे नागपूरमधील चुका टाळून पुण्यात अधिक चांगले काम होईल,'' असेही त्यांनी सांगितले. रिंग रोडची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यांना हवी ती मदत केंद्राकडून करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

महामार्ग प्राधिकरणाचे डी. ओ. तावडे यांनी प्रास्ताविक केले; तर राजेश्‍वरसिंग यांनी आभार मानले. 

"ई- बस'शिवाय पर्याय नाही 
रस्त्यांची रुंदी वाढविण्यावर आता मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे इलेक्‍ट्रिकवरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशिवाय म्हणजेच "ई- बस'शिवाय या पुढे पर्याय नाही. नागपूरमध्ये 200 टॅक्‍सी इलेक्‍ट्रिकवर धावत आहेत. लवकरच ही संख्या एक हजार होणार आहे. सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्याशिवाय खासगी वाहनांचा वापर कमी होणार नाही. त्यामुळेच "ई-बस'च्या वापराला केंद्र सरकार प्रोत्साहन देत असल्याचे गडकरी यांनी नमूद केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com