उत्तर कोकणात अतिवृष्टीची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

पुणे - कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा यांसह उत्तराखंड, पश्‍चिम मध्य प्रदेश, गुजरात, पश्‍चिम बंगालमध्ये मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्‍यता आहे. दक्षिण कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

कोकण-गोव्यासह संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी सोमवारी मुसळधार पाऊस पडला. मध्य ओडिशा, छत्तीसगड येथे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, येथे चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच दक्षिण राजस्थानातही वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. या प्रभावामुळे राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. मंगळवार (ता. 30) आणि बुधवारी (ता. 31) कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल.

पुण्यातही येत्या दोन दिवसांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे. कोकणात कल्याण, पेण, पोलादपूर, माणगाव, देवगड, चिपळूण यांसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला; तर मध्य महाराष्ट्रात महाबळेश्‍वर, नगर, गगनबावडा, राधानगरी यांसह लोणावळा, पौड, मुळशी, शिरूर यांसह अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या चोवीस तासांत पुणे - 4, महाबळेश्‍वर - 51, सोलापूर -7, रत्नागिरी -35, अलिबाग -70, अमरावती -11, चंद्रपूर -9 मिमी पावसाची नोंद झाली.