एनएसजी कमांडोंकडून सिंबायोसिसमध्ये "मॉकड्रील' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

पुणे - दहशतवादी हल्ला झाल्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी नॅशनल सिक्‍युरिटी गार्ड (एनएसजी) च्या पथकाने सिंबायोसिस महाविद्यालयाच्या परिसरात मंगळवारी रात्री "मॉकड्रील' घेतले. त्यामुळे परिसरातील रस्ते बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडी झाली होती. अचानक काहीतरी घडल्याचा मेसेज व्हॉटस्‌ऍपवरून फिरत असल्यामुळे या परिसरात चर्चेला उधाण आले होते. 

दहशतवाद्यांकडून शाळा-महाविद्यालयांना लक्ष्य केले जात आहे. दरम्यान, सिंबायोसिस महाविद्यालयात परदेशातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हा संभाव्य धोका लक्षात घेऊन सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी एनएसजी पथकांकडून "मॉकड्रील' घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

मंगळवारी रात्री दिल्ली येथून एनएसजी कमांडोंचे दोन पथके पुण्यात दाखल झाले. विमानतळापासून सिंबायोसिस महाविद्यालयापर्यंत एक पथक 18 मिनिटांत दाखल झाले. तर, दुसऱ्या पथकाला पोचण्यास 15 मिनिटे लागली. त्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून विमानतळ येथून सिंबायोसिस महाविद्यालयापर्यंत "ग्रीन कॉरिडॉर' करण्यात आला होता. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या मार्गांवरील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. रात्री सव्वानऊच्या सुमारास एनएसजीच्या वाहनांचा ताफा सिंबायोसिस परिसरात आला. त्यापूर्वी भांडारकर इन्स्टिट्यूटपासून सिंबायोसिसकडे जाणाऱ्या रस्त्यावर सेनापती बापट जंक्‍शन आणि वि. स. खांडेकर चौकात वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे डेक्‍कन परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.