प्रशिक्षित डॉक्‍टरांची संख्या वाढतेय

प्रशिक्षित डॉक्‍टरांची संख्या वाढतेय

पुणे - हृदय, यकृत, मूत्रपिंड असे महत्त्वाचे अवयव व्यवस्थित काम करत असताना रुग्ण ‘मृत’ झाला आहे, हे स्वीकारणे किती अवघड आहे!  मेंदूचे कार्य बंद पडल्यावर इतर अवयव कार्य करत असतानाही व्यक्ती अचेतन होते आणि कायद्याच्या दृष्टीने अशी व्यक्ती ‘ब्रेन डेड’ असते. कार्य थांबल्यावर इतर अवयव काही काळ व्यवस्थित कार्य करू शकतात आणि योग्य व्यक्तीला त्यांचे रोपण केले जाऊ शकते. मृत व्यक्तीचे अवयव दान करेपर्यंत शरीर योग्य अवस्थेत टिकवणे, हा वैद्यकीय कौशल्याचा भाग आहे. पुणे शहरातही आता असे प्रशिक्षण घेतलेले तज्ज्ञ डॉक्‍टर आहेत आणि ते अवयव दानात भाग घेत आहेत, अशी माहिती अतिदक्षता शास्त्रतज्ज्ञ डॉ. उर्वी शुक्‍ल यांनी दिली.

रुग्ण ‘ब्रेन डेड’ झाल्यानंतरही काही काळ शरीरातले अवयव उपयुक्त अवस्थेत ठेवणे व अवयवदान घडवून आणणे हे फार अवघड काम आहे. त्यासाठी उच्च दर्जाचे वैद्यकीय कौशल्य आणि प्रशिक्षण आवश्‍यक असते. सुदैवाने पुण्यात आता अशा प्रशिक्षित डॉक्‍टरांची संख्या वाढते आहे. कार्य थांबले आहे. हे ठरविण्याच्या चाचण्या सरकारने निश्‍चित केल्या आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अवयव दानाची विशिष्ट परवानगी मिळते. 
- डॉ. उर्वी शुक्‍ल, अतिदक्षता शास्त्रतज्ज्ञ

तज्ज्ञांच्या माहितीचे अचूक विश्‍लेषण
प्रशिक्षित डॉक्‍टरांचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने अवयव दानाच्या चळवळीला शहरात वेग मिळत आहे. रुग्णाच्या प्रकृतीबद्दल वेगवेगळ्या विशेषज्ज्ञ डॉक्‍टरांनी दिलेल्या मताचे अचूक विश्‍लेषण करण्याचे प्रावीण्य डॉक्‍टरांनी मिळविले आहे. त्यातून योग्य वेळी रुग्णाला ‘ब्रेन डेड’ घोषित करून त्याचे अवयव मरणोत्तर दान करण्यासाठी चांगले ठेवण्यात वैद्यकीय तज्ज्ञांना यश येत आहे.

 आपल्या प्रेमाच्या व्यक्तीचा मृत्यू स्वीकारणे हेच मुळी अवघड आहे. अशा अवस्थेत अवयवदानाचा निर्णय घ्यायला मदत करणे, हे अतिदक्षता तज्ज्ञांचे काम असते. व्यक्ती ‘ब्रेन डेड’ आहे हे ठरविण्याचे कायद्याने ठरवलेले निकष आहेत. त्याप्रमाणे निर्णय घेण्याचे अधिकार सरकारने थोड्या डॉक्‍टरांना दिले आहेत. त्यांच्याशिवाय इतर कोणीही हा निर्णय घेऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या सर्व वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेतून जाण्यास मदत करणे हे अवयवदान टीमचे काम असते, असेही डॉ. शुक्‍ल यांनी सांगितले.

सुशिक्षित कुटुंब असेल, तर अवयव दानाची माहिती देणे सोपे जाते असे नव्हे. अनेक गैरसमज नातेवाइकांची विचार प्रक्रिया थोपवतात. अनेकदा असा अनुभव येतो की ग्रामीण आणि अशिक्षित कुटुंबीयही ही माणुसकीची भावना जास्त सहज समजतात आणि अवयवदानासाठी तयार होतात, असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले.

सर्वांच्या सहकार्याने आणि एकमताने, तज्ज्ञ डॉक्‍टर आता पुण्यात हे काम करू शकत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. डॉक्‍टर आणि रुग्णाचे नातेवाईक यांच्या सहकार्यातून हा जीवनदान प्रयोग यशस्वी होतो आहे, ही पुण्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे डॉ. शुक्‍ल यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com