ज्येष्ठच ज्येष्ठांची ‘काठी’

ज्येष्ठच ज्येष्ठांची ‘काठी’

पुणे - एकाकीपणा आणि शारीरिक अक्षमतेमुळे नैराश्‍याने ग्रासलेल्या ज्येष्ठ नागरिकांना स्वतःची दैनंदिन कामे स्वतःच करावी लागत आहेत. बहुतांश वेळेला पोटच्या मुलांमुळेच ‘अडगळीतली वस्तू’ म्हणून ज्येष्ठांचीच कुचंबणा होते; मात्र आपल्या वाट्याला आलेल्या दुःखावर मात करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाच्या मदतीने ज्येष्ठच ज्येष्ठांची आधाराची ‘काठी’ होत आहेत. स्वतःची मुले, नातेवाईक असूनही बहुतांश वेळेला परावलंबित्वाचे जिणे जगावे लागणाऱ्या एकाकी वृद्धांना वृद्धांचाच आधार घ्यावा लागत असून, सार्वजनिक रुग्णालयांमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्डची व्यवस्था नसल्याची खंतही ते व्यक्त करत आहेत.

‘डे केअर सेंटर’ तसेच वृद्धाश्रमांमध्ये एकटी महिला किंवा पुरुष असे अनेक ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास आहेत. आर्थिक स्थिती बऱ्यापैकी चांगली आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णतः परावलंबी, अशा अवस्थेत ज्येष्ठांना दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत असल्याचे वास्तव आहे. वस्तुतः समाजात मिसळण्याची सवय मनुष्याला अंगभूतच असते; पण एकटेपणामुळे ज्येष्ठांना त्यांचे मन मोकळेही करता येत नाही. परिणामी, आरोग्याच्या समस्यांना त्यांचे त्यांनाच तोंड द्यावे लागत आहे. वृद्धाश्रमांतर्फे त्यांची काळजी घेतली जाते; परंतु आपलं असं कोणीच नसल्याने त्यांच्या मनाची घालमेल होत राहते. त्यातून मार्ग काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघांतर्फे विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला, डॉक्‍टर तुमच्या दारी, कायदेविषयक सल्ला केंद्र, विरंगुळा केंद्र यांसारख्या सामाजिक उपक्रमांद्वारे ज्येष्ठच ज्येष्ठांची सावली होऊ लागले आहेत. मुलांशी न पटणे किंवा पटवून न घेणे, काही वेळेस ज्येष्ठांना तरुण पिढी समजून घेत नाही, तर तरुण पिढीला ज्येष्ठ समजून घेत नाहीत, यांसारख्या पुष्कळशा बाबी ज्येष्ठांच्या एकाकीपणाला कारणीभूत ठरत आहेत. अंथरुणावर खिळवून पडलेल्या ज्येष्ठांकडे पाहणेही अनेकदा अवघड होऊन बसत असल्याचे स्वयंसेवी संस्था, संघटना आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य सांगतात. 

ऑल इंडिया सिनिअर सिटिझन्स कॉन्फेडरेशन, फेस्कॉम, ॲस्कॉम यांसारख्या संघटनांमार्फत एकाकी ज्येष्ठांबाबत विविध उपक्रमही राबविण्यात येत आहेत; मात्र ग्रामीण भागापेक्षाही शहरातील उच्चशिक्षित कुटुंबातील ज्येष्ठांच्या एकाकीपणाची समस्या सर्वाधिक गंभीर असल्याचे निरीक्षण संस्थांनी नोंदविले आहे.

ज्येष्ठांनी मुला-मुलींच्या मतांना किंमत द्यायला हवी. माझेच ऐकले पाहिजे, असा अट्टहास धरू नये. आपला मोठेपणा मागे घेत परिस्थिती व कुटुंबीयांशी जुळवून घ्यायला हवे. तसेच तरुण पिढीनेही ज्येष्ठांविषयी आदरभाव ठेवायला हवा. त्यांच्याशी मोकळेपणाने बोलले पाहिजे. आपल्याशी कोणीतरी बोलत आहे, ही भावनाही ज्येष्ठांना आनंद देते. त्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्यही चांगले राहते अन्‌ नैराश्‍य येत नाही.
- अंजली राजे, कार्यकारी संचालक, आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्र

पुण्यात ४४ विरंगुळा केंद्रे उभारली असून, त्याद्वारे त्यांना वाचन व टीव्ही पाहण्याची सोय केली आहे. सरकारतर्फे ज्येष्ठांना ९०० रुपये अनुदान मिळते ते १५०० पर्यंत द्यावे, यासाठी ‘फेस्कॉम’चे प्रयत्न सुरू आहेत. रेवदंडा येथील संघातर्फे समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबविले जाते, तर लातूर येथे संघातर्फे ज्येष्ठांना मोफत जेवणाची व्यवस्था होते; परंतु एकाकीपणा ही गंभीर समस्या असून, ज्येष्ठांचा आत्मसन्मान जपणे हे तरुण पिढीचेही कर्तव्य आहे. 
- अरुण रोडे, महासचिव, फेस्कॉम

ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाययोजना
संघाचे सभासद करून घेणे 
ज्येष्ठांकरिता कॅरम, बुद्धिबळ अशा बैठ्या खेळांची व्यवस्था 
ज्येष्ठांसमवेत गप्पागोष्टी, विचारविनिमय करणे 
ज्येष्ठांमधील अंगभूत कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे 
पोलिस आयुक्तालयातर्फे ज्येष्ठांसाठी १०९० ही हेल्पलाइन
स्वयंसेवी संस्था, नगरसेवकांमार्फत रुग्णवाहिकेची सोय करवून देणे 
विरंगुळा केंद्राद्वारे ग्रंथालयाची सुविधा 
संघाच्या सदस्यांच्या वर्गणीतून भोजन व्यवस्था 
आरोग्यविषयक मार्गदर्शन व उपचारांसाठी मदत

ज्येष्ठांच्या समस्या
एकलकोंडा, चिडचिडा व हट्टी स्वभाव
शारीरिक अक्षमता 
आरोग्याची हेळसांड 
एकटेपणामुळे आलेले नैराश्‍य 
स्वतःची कामे स्वतःच करावी लागणे 
आर्थिक दुर्बलता 
उपचाराचा खर्चही न झेपणे 
मनोरंजनाच्या साधनांचा अभाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com