जर्मनीतील स्पर्धेसाठी तिघांना प्रत्येकी एक लाखाची शिष्यवृत्ती

जर्मनीतील स्पर्धेसाठी तिघांना प्रत्येकी एक लाखाची शिष्यवृत्ती

‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ आणि ‘युगल धर्म संघा’चा पुढाकार; ज्युनिअर मेंटल कॅल्क्‍युलेशन चॅम्पियनशिप 

पुणे - बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकारातून गणिती आकडेमोडीची चमक स्पष्ट करणारी ‘ज्युनिअर मेंटल कॅल्क्‍युलेशन चॅम्पियनशिप २०१७’ स्पर्धा जर्मनीतील बेलफिल्ड येथे होत आहे. २९ सप्टेंबर ते ३ ऑक्‍टोबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत पुण्यातील तीन विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यांना ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची आणि ‘युगल धर्म संघा’तर्फे प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली.

‘सकाळ’ कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’चे उपाध्यक्ष एस. पद्मनाभन, फाउंडेशनचे कार्यकारी सचिव डॉ. अरुणकुमार कालगावकर, ‘सकाळ’चे संपादक मल्हार अरणकल्ले, युगल धर्म संघाचे अध्यक्ष विजय भंडारी, सचिव गौतम गेलडा, ‘जिनिअस किड’चे संचालक आणि ऑलिंपिक कोच फॉर मेमरी ॲण्ड मेंटल स्पोर्टस (पुणे विभाग)चे आनंद महाजन आणि मोनिता महाजन उपस्थित होते. पार्थ तुपे, ओम धुमाळ आणि पार्थ मोरे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. डॉ. कालगावकर यांनी आत्तापर्यंत दिलेल्या शिष्यवृत्तींविषयीची माहिती उपस्थितांना दिली. जर्मनीत होणाऱ्या स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांना उपस्थितांनी शुभेच्छाही दिल्या.

पद्मनाभन म्हणाले, ‘‘परिश्रमातूनच यश संपादन करता येते, त्याद्वारेच प्रगती होते. भारताने जगाला शून्याची देणगी दिली. माहिती तंत्रज्ञान विषयातही भारतीय अग्रेसर आहेत. मला विश्‍वास आहे, की विद्यार्थ्यांना केलेल्या आर्थिक मदतीचे फलस्वरूप स्पर्धेतून दिसेल.’’ भंडारी म्हणाले, ‘‘ ‘सकाळ’ म्हटले की विश्‍वासार्हता. अनेक सामाजिक गोष्टी ‘सकाळ’मार्फत राबविण्यात येतात. सकाळ इंडिया फाउंडेशनदेखील समाजाचा बारकाईने विचार करत असून, हा उपक्रम स्तुत्य आहे.’’

‘जीनिअस कीड ॲकॅडमी’च्या आनंद सरांचे मला मार्गदर्शन लाभले. गणिते सोडविताना अवघड वाटले नाही. सहज सोडवत होतो. त्यामुळे स्पर्धेसाठी माझी निवड झाली.
- पार्थ तुपे, रोझरी हायस्कूल

मला पहिल्यापासूनच गणिताची आवड आहे. यापूर्वी मी टर्की ओपन चॅम्पियनशिपमध्येही भाग घेतला होता. गेल्या वर्षापासून मी जर्मनीतील स्पर्धेसाठी तयारी करतोय.
- ओम धुमाळ, पवार पब्लिक स्कूल

गणिताचा सराव मी पहिल्यापासून करत होतो. सुरवातीला गणित सोडविणे अवघड वाटायचे; पण सराव केल्याने आता सोपे जाते. जर्मनीतील स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांनी आमचा सत्कार केला.
- पार्थ मोरे

अशी आहे स्पर्धा 
हजार आकड्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार.
पाच आकडी संख्या गुणिले पाच आकडी संख्या
पाच व सहा आकडी संख्येचा वर्ग ओळखणे. 
पाचशे वर्षांतील कोणत्याही तारखेचा दिवस ओळखणे. 
दिवस, तारीख, वर्ष दिल्यास महिना ओळखणे. 
तासांपासून ते महिन्यांपर्यंतचे सेकंद ओळखणे. 
आणि हे सर्व काही सेकंदांत.

सकाळ इंडिया फाउंडेशनने आतापर्यंत दिलेल्या शिष्यवृत्ती   

शिष्यवृत्तीचे एकूण लाभार्थी विद्यार्थी - ५६१०  
वितरित शिष्यवृत्ती - ३ कोटी ९० लाख २४ हजार ७७३ रुपये.
५७ वर्षांपासून उच्चशिक्षणाकरिता परदेशी गेलेल्या १०९४ विद्यार्थ्यांना वितरित केली एकूण २ कोटी ३७ लाख ६१ हजार रुपयांची शिष्यवृत्ती.
३२ वर्षांपासून करिअर डेव्हलपमेंटकरिता ३७५१ विद्यार्थ्यांनी घेतली एकूण १ कोटी ३९ लाख ६३ हजार ४७३ रुपयांची शिष्यवृत्ती.
४० वर्षांपासून संशोधनाकरिता ६० विद्यार्थ्यांनी घेतली एकूण १ लाख ८७ हजार ५०० रुपयांची शिष्यवृत्ती.
२१ वर्षांपासून पत्रकारितेकरिता नऊ विद्यार्थ्यांनी घेतली एकूण ९० हजार रुपयांची शिष्यवृत्ती.
गेल्या वर्षी ‘मेमोरेड ऑलिंपिक्‍स २०१६’करिता तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती. तसेच, जिनिअस किड ॲकॅडमी, वापी, गुजरात यांनाही ५० हजार रुपये देणगीच्या स्वरूपात दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com