परवानाधारकांना शस्त्रे जमा करण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

पुणे - जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यातील ३६ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण ४७५ परवानाधारकांकडील शस्त्रे सात दिवसांच्या आत पोलिसांकडे जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिला आहे.  

निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी व पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांच्या उपस्थित बैठक झाली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला. पोलिसांनी संबंधित शस्त्र परवानाधारकांना निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापूर्वी शस्त्र जमा करून घ्यावेत. हा आदेश २६ ऑक्‍टोबरपर्यंत जिल्ह्यात लागू राहील. तसेच त्यानंतर सात दिवसांच्या आत संबंधितांना त्यांचे शस्त्र परत करावेत. जमा केलेली शस्त्रे ठेवण्याची योग्य व्यवस्था करावी. शस्त्रे जमा करताना ज्या स्थितीत होती, त्या स्थितीतच परवानाधारकास परत केली जावी, अशा सूचना या वेळी पोलिसांना देण्यात आल्या. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती ‘भारतीय दंड संहिता कलम १८८’ मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.