एकमताने निर्णय घेण्याची संस्कृती रुजतेय

योगिराज प्रभुणे
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

पुणे - अवयवदानाचा निर्णय हा कुटुंबाने एकमताने घेण्याची संस्कृती शहरात निर्माण होत आहे. यात तरुणांची भूमिका महत्त्वाची असून, जुन्या प्रथा आणि गैरसमज यातून निश्‍चित दूर होत आहेत, असे निरीक्षणही वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. 

पुणे - अवयवदानाचा निर्णय हा कुटुंबाने एकमताने घेण्याची संस्कृती शहरात निर्माण होत आहे. यात तरुणांची भूमिका महत्त्वाची असून, जुन्या प्रथा आणि गैरसमज यातून निश्‍चित दूर होत आहेत, असे निरीक्षणही वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. 

शहरात अवयवदानाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. यात मेंदूचे कार्य थांबलेल्या (ब्रेन डेड) रुग्णाच्या नातेवाइकांमधील तरुणांची मोठी भूमिका आहे. अत्यंत शोकाकूल वातावरणात एका बाजूला जवळच्या नातेवाइकांना आधार देत असतानाच दुसरीकडे आपल्या जवळच्या व्यक्तीचे अवयवदान करण्याची जबाबदारी ही तरुण मुले पार पाडताना दिसत आहेत. यात मुलांप्रमाणेच मुलीही तितक्‍याच समंजसपणे हे निर्णय घेत असल्याचे दिसते, असेही निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदविले.

शहरात तीन वर्षांपूर्वी पहिले हृदयदान करण्यात आले. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिचे अवयवदान करण्याचा निर्णय घेण्यात त्यांच्या मुलीचा वाटा मोठा होता. या पार्श्‍वभूमीवर जहांगीर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ डॉ. कयानुश कडपट्टी ‘सकाळ’शी बोलताना म्हणाल्या, ‘‘रुग्ण ‘ब्रेन डेड’ घोषित करण्याचे निकष कायद्याने निश्‍चित केले आहेत. यासाठी वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्याही करण्यात येतात. वैद्यकीय तज्ज्ञ आणि समाजसेवक ‘ब्रेन डेड’ रुग्णाच्या नातेवाइकांना याबाबतची माहिती देतात. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.’’

...तेव्हाच ‘ब्रेन डेड’ जाहीर 
‘‘वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्ष आणि विशेषज्ञ डॉक्‍टरांची निरीक्षणे या आधारावर रुग्णाला ‘ब्रेन डेड’ जाहीर केले जाते. रुग्णाचे वय, त्याचा आजार, त्याला असलेल्या इतर व्याधी, तसेच दान करणाऱ्या अवयवांची स्थिती, त्याची कार्यक्षमता अशा वेगवेगळ्या निकषांवर अवयवदानाचा निर्णय घेतला जातो,’’ असे डॉ. कयानुश कडपट्टी यांनी सांगितले.

भावनिक आधार महत्त्वाचा
अवयवदानाबाबतचे गैरसमज दूर करण्याचे काम पुण्यातील तरुण आपल्या कृतीतून करून देत आहेत. असे अनेक हृदयद्रावक अनुभव अवयवदानातून मिळाल्याचे डॉ. कडपट्टी यांनी सांगितले. अवयवदानाबाबत तरुण जागृत होत असल्याने तो हे निर्णय घेत आहे. त्यासाठी काही वेळा कुटुंबातील मोठ्या माणसांना समजून सांगावे लागते, त्यांना भावनिक आधार द्यावा लागतो, यात तरुणांची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याचे पुढे येत आहे.