भातशेतीमध्ये काळा बिबट्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

पुणे - सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतील फुलांच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले हौशी वनस्पती शास्त्रज्ञ श्रीकांत इंगळहळीकर यांच्या प्रयत्नातून सिंहगड रस्त्यावरील डोणजे फाटा येथे सलग दुसऱ्या वर्षी पॅडी आर्ट साकारण्यात आले आहे. त्यांनी शेतामध्ये ब्लॅक पॅन्थर अर्थात काळा बिबट्या साकारला आहे.

पुणे - सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतील फुलांच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले हौशी वनस्पती शास्त्रज्ञ श्रीकांत इंगळहळीकर यांच्या प्रयत्नातून सिंहगड रस्त्यावरील डोणजे फाटा येथे सलग दुसऱ्या वर्षी पॅडी आर्ट साकारण्यात आले आहे. त्यांनी शेतामध्ये ब्लॅक पॅन्थर अर्थात काळा बिबट्या साकारला आहे.

व्यवसायाने उद्योजक असलेल्या इंगळहळीकर यांनी जपानमधील पॅडी आर्ट प्रथमच पुण्यात आणले. त्यांनी गतवर्षी यातूनच साकारलेला गणपती आकर्षण ठरला होता. पॅडी आर्ट साकारताना जमिनीचा एका ‘कॅनव्हास’सारखा वापर केला जातो आणि विविध रंगांतील भाताची रोपे लावून रंगसंगती साधली जाते. जोराच्या पावसात गुडघाभर पाण्यात उभे राहून दोन रंगांच्या भातपिकाची पेरणी करणे हे आव्हानात्मक काम असल्याचे इंगळहळीकर यांनी सांगितले. 

या वर्षी साकारलेल्या काळा बिबट्याच्या चित्राचा आकार १२० बाय ८० फूट एवढा आहे. विशिष्ट जनुकीय रचनेमुळे या बिबट्याच्या त्वचेमध्ये मेलॅनिन द्रव्याचा प्रभाव अधिक असतो आणि त्यामुळे त्यांना संपूर्णत काळा रंग प्राप्त होतो. हा दुर्मिळ बिबट्या देशात प्रामुख्याने कर्नाटकच्या जंगलांमध्ये आढळतो. हे पॅडी आर्ट उंचावरून आणखीनच खुलून दिसत असून, पुणे आणि परिसरातील पर्यटकांसाठी ते एक आकर्षण ठरते आहे. जवळजवळ डिसेंबर महिन्यापर्यंत हे पॅडी आर्ट पाहता येणार आहे.

असा झाला या आर्टचा जन्म
दक्षिण जपानमधील ओमोरी जिल्ह्यात असलेले इनाकादाते या गावात पॅडी आर्टचा जन्म झाला. या भागात वर्षानुवर्षे भातशेती केली जाते. ही भातशेती कोणत्याही यंत्राच्या वापराविना केली जाते. काही वर्षांपूर्वी या भातशेतीला दोन हजार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तेथील शेतकऱ्यांनी उत्सव साजरा करण्याचे ठरवले आणि त्यातून पॅडी आर्ट ही कला जपानमध्ये १९९३ मध्ये लोकप्रिय झाली. इनाकादाते या गावात होणाऱ्या या उत्सवाची माहिती इंगळहळीकर यांना इंटरनेटच्या माध्यमातून मिळाली आणि त्यापासून प्रेरित होऊन त्यांनी आपल्या शेतात ही कला साकारली.