बारामती: भिगवण रस्त्याला समांतर रस्ता होणार

मिलिंद संगई
रविवार, 16 जुलै 2017

तीन हत्ती चौकापासून ते थेट पेन्सिल चौकापर्यंत भिगवण रस्त्याला दोन्हीबाजूला समांतर सेवा रस्ता करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाती घेतला आहे. या मध्ये कोर्ट कॉर्नर ते पेन्सिल चौकापर्यंतचा सेवा रस्ता पूर्ण झालेला असून त्या मुळे मुख्य भिगवण रस्त्यावरील वाहतूकीचा ताण खूपच कमी झाला आहे.

बारामती : शहरातील भिगवण रस्त्याला समांतर सेवारस्ता विकसीत करण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. नटराज नाट्य कला मंडळापासून पुढे बालनिरिक्षणगृह व त्या पुढील म.ए.सो. विद्यालयापर्यंतची भिंत पाडण्याच्या कामाला कालपासून प्रारंभ झाला.

तीन हत्ती चौकापासून ते थेट पेन्सिल चौकापर्यंत भिगवण रस्त्याला दोन्हीबाजूला समांतर सेवा रस्ता करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाती घेतला आहे. या मध्ये कोर्ट कॉर्नर ते पेन्सिल चौकापर्यंतचा सेवा रस्ता पूर्ण झालेला असून त्या मुळे मुख्य भिगवण रस्त्यावरील वाहतूकीचा ताण खूपच कमी झाला आहे. 

भिगवण रस्त्यावरील म.ए.सो. विद्यालय, विद्या प्रतिष्ठान मधील शाळातून जवळपास आठ ते नऊ हजार विद्यार्थी दररोज या रस्त्याचा वापर करतात. या रस्त्यावर अनेकदा अपघात होऊन त्यात अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सेवा रस्ता विकसीत करुन वाहतूकीचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे. 

त्या नुसार तीन हत्ती चौकापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सेवा रस्त्याचे काम नगरपालिकेने सुरु केले आहे. नटराज पुढील रस्त्याचे काम पूर्ण झाले होते, त्या नंतर म.ए.सो. विद्यालयापर्यंत आतून भिंत उभारण्याचे काम पूर्ण झाले होते, मात्र तेथे रस्ता विकसीत करण्याचे काम रखडले होते. दरम्यान काल म.ए.सो. विद्यालयापुढील भिंत पाडून टाकण्यात आली. जेसीबी यंत्राने रस्ता तयार करण्याची पूर्वतयारी सुरु झाली आहे. 

रेल्वेकडे प्रस्ताव सादर होणार
दरम्यान म.ए.सो. हायस्कूलसमोरील जागा रेल्वेच्या ताब्यात असल्याने खासदार सुप्रिया सुळे या जागेबाबत दिल्लीत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा करणार आहेत. तसा प्रस्ताव नगरपालिकेकडून तयार करण्यात आला असून लवकरच या जागेबाबतही रेल्वेमंत्री निर्णय घेतील अशी अपेक्षा नगरपालिका प्रशासनाला आहे. मात्र तो पर्यंत एका बाजूच्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेत नगरपालिकेने हे काम सुरु केले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :