रहिवाशांनी फुलविला ‘पारिजात’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

घराच्या आवारात चिकू, फणस, नारळ, केळी, लिंब या फळांबरोबरच शेवगा, आळू अशा वेगवेगळ्या भाज्या लावल्या आहेत. त्यामुळे अनेकदा बाजारात जाऊन ही फळे किंवा या भाज्या आणण्याची गरजच आम्हाला भासत नाही.
- रजनीकांत जगताप 

‘स्वच्छ सोसायटी’साठी तळमळ; परिसरातच जिरतो कचरा 
पुणे - पारिजात... नाव घेताच आपल्या प्रत्येकाच्या मनात सुगंध दरवळतो. तो सुगंध अनुभवायला मिळाला ‘पारिजात सोसायटी’त प्रवेश करताच. तसेच वेगवेगळ्या औषधी वनस्पतीही होत्या. इतकेच काय, काहींनी तर भाजीपालासुद्धा घराबाहेरील आवारात लावला होता. ही किमया घडली ती सोायटीतील कचऱ्याचे योग्य नियोजन केल्याने.

सोसायटीचा परिसर ‘हिरवागार’
यासंदर्भात सोसायटीचे माजी अध्यक्ष रजनीकांत जगताप म्हणाले, ‘‘सोसायटीच्या आवारातील कचरा सोसायटीतच जिरवायचा हा उपक्रम आम्ही हातात घेतला. सोसायटीतील सर्वांच्या सहभागामुळे तो यशस्वीही झाला. त्यामुळेच सोसायटीचा परिसर कायम ‘हिरवागार’ दिसतो. केवळ सोसायटीचा परिसर हिरवा करून आम्ही थांबलो नाही. प्रत्येकाच्या घरात तर काहींच्या गच्चीवर फळा-फुलांची वेगवेगळी झाडे आहेत. ‘सोसायटीतील कचरा सोसायटीतच’ या पद्धतीने घरातील सुका कचरा घरातच जिरवायचा यावर आमच्यापैकी अनेकांचा भर आहे. त्यामुळे या सोसायटीतील बहुतांश घरातसुद्धा गांडूळ खत तयार होते. त्या खताचा वापर घरातील झाडांसाठी केला जातो.’’

वाढदिवसाला रोप भेट
सोसायटीच्या सदस्या देविका काशिकर म्हणाल्या, ‘‘सोसायटीत कचरा राहू नये म्हणून वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. ओला-सुका कचऱ्याबाबत सातत्याने जनजागृती केली जाते. सांडपाण्याचा वापरही झाडांसाठी केला जातो. सोसायटीतील सदस्याचा वाढदिवस असला की प्रत्येकाला आवडीचे रोप भेट म्हणून आवर्जून दिले जाते. रस्त्यांची वारंवार स्वच्छता केली जाते. डास होऊ नयेत म्हणून वेळोवेळी फवारणी केली जाते. प्लॅस्टिक पिशव्या किंवा इतर वस्तू सोसायटीच्या आवारात पडणार नाहीत, याचीही काळजी घेतली जाते.’’