पार्किंगचे व्यवस्थापन महत्त्वाचे - डॉ. बार्टर 

पार्किंगचे व्यवस्थापन महत्त्वाचे - डॉ. बार्टर 

पुणे -  ‘‘शहरातील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी जागेपेक्षा पार्किंगचे व्यवस्थापन महत्त्वाचे ठरणार असून, त्यामुळे उपलब्ध पार्किंग व्यवस्थेची कार्यक्षमता वाढेल,’’ असे आंतरराष्ट्रीय पार्किंग धोरण व व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. पॉल बार्टर यांनी सोमवारी सांगितले. ‘महापालिकेने तयार केलेले पार्किंग धोरण उपयुक्त आहे, मात्र, त्याची अंमलबजावणी व्हावी,’  अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

शहरातील पार्किंगव्यवस्था, समस्या आणि धोरणासंदर्भात विचारविनिमय करण्याच्या उद्देशाने महापालिका, ‘इन्स्टिट्यूट फॉर ट्रार्न्स्पोटेशन अँड डेव्हल्पमेंट पॉलिसी’ (आयटीडीपी), वाहतूक पोलिस यांच्यातर्फे येत्या ७ आणि ८ जूनला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने डॉ. बार्टर पुण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. बार्टर यांनी ‘सकाळ’ कार्यालयाला भेट देऊन संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी चर्चा केली. ‘आयटीडीपी’च्या प्रांजली देशपांडे-आगाशे उपस्थित होत्या. 

डॉ. बार्टर म्हणाले, ‘‘पुणे शहरातील वाहनांची संख्या वाढत आहे. त्यासाठी पार्किंगच्या जागा वाढवून भागणार नाही. रस्त्यालगतच्या पार्किंगचे व्यवस्थापन सक्षम केले पाहिजे. त्यात प्रामुख्याने पार्किंग व्यवस्थेची रचना करून ती अंमलात आणली पाहिजे. रस्ता, तेथील वर्दळ, दिवस आणि वेळेनुसार पार्किंगचे दर ठरविण्याची गरज आहे. तसे झाल्यास त्या त्या भागातील पार्किंगची कार्यक्षमता वाढेल. मात्र, पार्किंगचे नियोजन करताना सर्वत्र घटकांमध्ये समन्वय साधून एकत्र काम झाले पाहिजे. सावर्जनिक वाहतूकव्यवस्था म्हणजे बसगाड्यांच्या मार्गालगत वाहने उभी करण्याची सोय असावी. त्यामुळे सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेला काही प्रमाणात चालना मिळेल. नागरिकांना बाजारपेठांमध्ये पायी जाता येईल, त्याकरिता मध्यवर्ती पार्किंग व्यवस्था उभारण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.’’ 

‘‘रस्त्यांलगतच्या पार्किंगचे नियोजन केल्यास पादचारी आणि वाहनांच्या वाहतुकीसाठी पुरेसा रस्ता उपलब्ध करता येणार आहे. त्यातून सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण होईल,’’ असेही ते म्हणाले.

कार्यशाळा उद्यापासून 
महापालिका ‘आयटीडीपी’ आणि वाहतूक पोलिसांतर्फे आयोजित कार्यशाळा घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात होणार आहे. येत्या बुधवारी (ता.७) सकाळी दहा वाजता कार्यशाळेचे उदघाटन होणार असून,  महापालिका, महापालिकेचा वाहतूक विभाग, वाहतूक पोलिस आणि या क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे, गुरुवारी (ता.८) दुपारचे सत्र सर्वांसाठी खुले राहणार आहे. जगभरातील विविध शहरांमधील पार्किंग धोरणे, त्याची अंमलबजावणीच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात नेमक्‍या कोणत्या उपाययोजना राबविणे शक्‍य आहे, याबाबत कार्यशाळेत चर्चा होणार आहे, अशी माहिती ‘आयडीटीपी’च्या प्रांजली देशपांडे-आगाशे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com