काल आलेल्या व्यक्तीने शहाणपण शिकवू नये - मोहोळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

पुणे - 'संजय काकडे यांना आम्ही आमचा नेता मानत नाही, त्यामुळे त्यांचे वक्तव्य गांभीर्याने घेण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. आम्ही पदाधिकारी गेल्या 25 वर्षांपासून भाजपचे काम करीत आहोत. त्यामुळे पक्षात काल आलेल्या व्यक्तीने आम्हाला शहाणपण शिकवू नये,'' प्रत्युत्तर स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी खासदार काकडे यांना दिले.

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी "आमचे पदाधिकारी बावळट आहेत', असे वक्तव्य केल्यावर राजकीय वर्तुळात त्याचे तीव्र पडसाद उमटले. मोहोळ म्हणाले, 'समान पाणी योजनेच्या निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीकडे आल्याही नव्हत्या. प्रशासकीय विषय होता. जादा दर आल्यामुळे सर्वांनी चर्चा करून सामूहिक निर्णय घेतला. त्यात पदाधिकाऱ्यांचा बावळटपणा कसा काय? महापालिकेचे हित बघितले, हा काही बावळटपणा आहे का?'' कोणाचा रस कशात आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. मुळात आम्ही काकडे यांना आमचा नेता समजतच नाही. देवेंद्र फडणवीस, गिरीश बापट, अनिल शिरोळे, योगेश गोगावले हे आमचे नेते आहेत. त्यामुळे काकडे यांनी आम्हाला शिकवू नये, असे मोहोळ म्हणाले.

महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, 'आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चाच केली नाही, तर त्यांनी निर्णय घेतला, असे कसे म्हणता येईल. पदाधिकारी आणि आयुक्तांच्या चर्चेनंतर पालकमंत्री बापट आणि पक्षनेतृत्वाला आम्ही निर्णयांची माहिती दिली.'' आम्ही बावळट आहोत, या प्रतिक्रियेबाबत मी काय बोलू, असे म्हणत याबाबत अधिक भाष्य करण्याचे महापौरांनी टाळले.

सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी, काकडेंची ही प्रतिक्रिया आवडली नाही, असे म्हणत पुढील बोलणे टाळले. तर, राष्ट्रवादीचे गटनेते चेतन तुपे म्हणाले, ""काकडे यांना भाजपची माहिती अधिक आहे. त्यामुळे त्यांचे म्हणणे बरोबर असावे.'' तर, कॉंग्रेसचे आबा बागूल यांनी, "उशिरा का होईना, भाजपला शहाणपण सुचले; पण त्यांना बावळट ठरविणे हास्यास्पद आहे,'' असे सांगितले.