प्लॅस्टिक पिशव्यांची सर्रास विक्री

प्लॅस्टिक पिशव्यांची सर्रास विक्री

पुणे - शहरात कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही त्याची बेकायदा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे प्रमाण वाढत असल्याचे महापालिकेने केलेल्या कारवाईच्या आकडेवारीवरून आढळून आले. या व्यावसायिकांना दंडाचेच नव्हे; तर कायद्याचेही भय राहिले नाही. त्यामुळेच प्लॅस्टिक पिशव्यांची सर्रास विक्री होत आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांची विक्री करणाऱ्या तब्बल पावणेपाच हजार विक्रेत्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठ महिन्यांत ही कारवाई करण्यात आली. 

अशा विक्रेत्यांना रोखण्यासाठी नेमलेल्या विशेष पथकामार्फत नावापुरतीच कारवाई होत असल्याचेही महापालिकेच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. या पथकाच्या तुलनेत महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून बहुतांश व्यावसायिकांवर कारवाई होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्लॅस्टिक लवकर नष्ट होत नसल्याने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लॅस्टिक वापरण्यावर बंदी आहे. त्यात, एवढ्या क्षमतेच्या प्लॅस्टिकचे उत्पादन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा अधिकार राज्य सरकारकडे आहे, तर त्याची विक्री करणाऱ्यांवर महापालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येते. महापालिकेच्या हद्दीत २००९ पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे; त्याकरिता महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये आणि स्वतंत्र पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, या दोन्ही यंत्रणांकडून प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने बंदी असतानाही ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकची विक्री केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर राज्यात प्लॅस्टिक वापरावर संपूर्ण बंदी घालण्याच्या हालचाली राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहेत. त्यामुळे ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या प्लॅस्टिकचे उत्पादन आणि विक्रीच्या बंदीचा आढावा घेण्यात आला. गेल्या नऊ महिन्यांत बेकायदा प्लॅस्टिकची विक्री करीत असल्याचे आढळून आलेल्या सुमारे ४ हजार ६९१ व्यावसायिकांवर क्षेत्रीय कार्यालयाने कारवाई केली आहे; तर प्लॅस्टिकबंदीच्या देखरेखीसाठी नेमलेल्या स्वतंत्र पथकाने मात्र, जेमतेम ३११ जणांवर कारवाई केल्याचे महापालिकेकडे नोंद आहे. त्यानुसार या दोन्ही यंत्रणांनी साधारणपणे २३ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

याबाबत महापालिकेचे सहआयुक्त सुरेश जगताप म्हणाले, ‘‘शहरात ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या प्लॅस्टिक विक्रीवर बंदी आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर सातत्याने कारवाई केली जाते. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांकडील यंत्रणेच्या माध्यमातून तपासणी केली जाते. या कारवाईसाठी पुरेसे मनुष्यबळ आहे. तरीही काही भागात प्लॅस्टिकची विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याची तपासणी करून कठोर कारवाई करू.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com