महापालिकेकडून विसर्जनाची चोख व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

५७ ठिकाणी  - विसर्जन घाट
३५ ठिकाणी - नदीपात्र, विहिरी
५३ ठिकाणी - हौद बांधले 
११०  - लोखंडी टाक्‍या 

पुणे - गणेशोत्सवाच्या तयारी पाठोपाठ महापालिकेने विसर्जनाची व्यवस्थाही चोख केली आहे. शहराच्या विविध भागांत सुमारे २५५ ठिकाणी विसर्जन घाट, नदीपात्र, विहिरी, कालव्याबरोबरच हौद आणि लोखंडी टाक्‍यांची सोय करण्यात आली आहे. तसेच नदीपात्र आणि परिसरात महापालिकेचे कर्मचारी, जीवरक्षक, सफाई कामगारांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शहरात शुक्रवारी गणेशोत्सवाला सुरवात झाली असून, दीड दिवसाच्या बाप्पांचे शनिवारी (ता. २६) विसर्जन होईल. त्यानंतर पाचव्या, सातव्या आणि दहाव्या दिवशी गणेशाचे विसर्जन केले जाते. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेकडून विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक विसर्जनाचा भाग म्हणून हौद आणि लोखंडी टाक्‍यांमध्ये अमोनिअम बायकार्बोनेट (खाण्याचा सोडा) टाकण्यात येणार आहे. विसर्जनाच्या ठिकाणी विद्युत व्यवस्था, छोटेखानी मांडवही उभारले जात आहेत. या परिसरात जमा होणारा कचरा रोजच्या रोज उचलला जावा, यासाठी महापालिका आणि स्वच्छ संस्थेचे कामगार नेमले आहेत. जागेवरच कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येणार आहे.