ठेकेदारांच्या संपाचा प्रवाशांना फटका 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

पीएमपीच्या ठेकेदारांनी अचानक संप पुकारल्यामुळे सुमारे 380 बसची वाहतूक गुरुवारी दुपारी दोन वाजल्यापासून बंद होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. पर्यायी बससाठी प्रशासनाने प्रयत्न केले तरी, ते तोकडे पडत होते. त्यामुळे प्रवासी ठेकेदारांवर संतप्त झाले होते. संपानंतर प्रमुख स्थानकांवरील परिस्थितीचा "सकाळ'ने प्रत्यक्ष घेतलेला आढावा... 

पीएमपीच्या ठेकेदारांनी अचानक संप पुकारल्यामुळे सुमारे 380 बसची वाहतूक गुरुवारी दुपारी दोन वाजल्यापासून बंद होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. पर्यायी बससाठी प्रशासनाने प्रयत्न केले तरी, ते तोकडे पडत होते. त्यामुळे प्रवासी ठेकेदारांवर संतप्त झाले होते. संपानंतर प्रमुख स्थानकांवरील परिस्थितीचा "सकाळ'ने प्रत्यक्ष घेतलेला आढावा... 

रिक्षाचालकांची मनमानी 
शिवाजीनगर ः भाडेतत्त्वावरील बसच्या अचानकपणे सुरू झालेल्या संपामुळे शिवाजीनगर आणि महानगरपालिका (मनपा) येथील बसस्थानकात निर्माण झालेली बसची कमतरता, प्रवाशांची गर्दी, तासन्‌तास वाट पाहिल्यावरही बस न मिळाल्यामुळे त्रस्त प्रवासी, त्यांना उत्तरे देताना प्रशासनाची होणारी तारांबळ, असे चित्र शिवाजीनगर स्थानकावर पाहायला मिळाले. बस स्थानकावर एकूण बस संख्येच्या निम्म्या बस भाडेतत्त्वावरील असल्यामुळे ऐनवेळी बस वाहतूक सुरळीत करायची कशी, असा मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता. इतर मार्गावरील बस गर्दी असलेल्या मार्गावर वळवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मनपा स्थानकावरील कंट्रोलर बाळासाहेब मोहिते यांनी सांगितले. मात्र, उपलब्ध बस अपुऱ्या पडत असल्यामुळे अनेक प्रवासी रिक्षाने प्रवास करताना दिसले. या संधीचा फायदा घेत रिक्षाचालकांनी भाडे वाढविल्यामुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड सहन करावा लागला. 

जुन्या बस रस्त्यावर 
स्वारगेट ः दिवसभर सुरू असलेला पाऊस आणि बसचा संप यामुळे प्रवाशांचे हाल झाले. बस नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांमधून प्रवास करावा लागला. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आगारातील जुन्या बसगाड्या रस्त्यावर उतरवण्यात आल्या. मात्र या बसगाड्यांचे दरवाजे डाव्या बाजूने असल्यामुळे त्या बीआरटी मार्गामधून जाऊ शकत नव्हत्या. या बसगाड्या मुख्य रस्त्यावरून सोडल्या जात असल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पीएमपी मुख्यालयातील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध बस थांबे, आगार या ठिकाणी पाठविण्यात आले, असे स्वारगेट येथील नियंत्रक प्रदीप जाधव यांनी सांगितले. 

नागरिकांचे कर्मचाऱ्यांशी वाद 
पुणे स्टेशन ः पुणे स्टेशन येथून विश्रांतवाडी, कोंढवा गेट, पद्मावती, भारती विद्यापीठ, कोथरूड डेपो, गालिंदे पथ, इंदिरानगर अप्पर डेपो, आंबेगाव, राजगुरुनगरकडे जाणाऱ्या सुमारे 47 बस बंद होत्या. पर्यायी बसची संख्या अपुरी असल्यामुळे प्रवासी चिडले होते. दर 10 मिनिटाला येणारी बस तब्बल दीड तासांनी येत असल्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे प्रवाशांना इच्छित ठिकाणी जाण्यासाठी उपलब्ध बसमधून, प्रचंड गर्दीमध्ये प्रवास करावा लागला. उपलब्ध गाड्यांचे मार्ग बदलून गर्दी असलेल्या मार्गावर बस सोडल्या जात होत्या. उशिरा येत असलेल्या बसमध्ये प्रवाशांची संख्या 
मर्यादेपेक्षा जास्त होती. त्यामुळे बस कर्मचाऱ्यांशी प्रवाशांचे वाद होताना दिसत होते.