पीएमपी खासगी मालमत्ता नाही

पीएमपी खासगी मालमत्ता नाही

पुणे - ‘मुंढे हुकूमशहा होत आहेत’, ‘थेट बडतर्फी कशी करता, चौकशी तरी करा’, ‘पीएमपी म्हणजे कोणाची खासगी मालमत्ता नाही,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या सदस्यांनी पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्यावर टीकेची झोड उठविली. 

सभागृहनेते श्रीनाथ भिमाले म्हणाले, ‘‘सार्वजनिक वाहतूक सक्षम करताना पुणेकरांचा विचार केला पाहिजे. पीएमपीबाबत चर्चा करण्याच्या सभेतून मुंढे निघून गेले, त्यांचे हे वर्तन अशोभनीय आहे. नगरसेवकांना त्यांनी गृहीत धरू नये. अपंग कर्मचाऱ्यांना सेवेत घेतले पाहिजे. नगरसेवकांच्या भावना संचालक मंडळाच्या बैठकीत मांडल्या जातील.’’

विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले, ‘‘कामगार कपातीचे धोरण राबवून, उत्पन्न वाढविण्यात कौशल्य नसते. पीएमपी सक्षम करण्यासाठी मुंढे यांच्याकडे जबाबदारी दिली, पण, ते कामगारांना काढत आहेत. कल्पना न देताच, मुंढे यांनी सभेतून काढता पाय घेतल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई का करू नये. ज्येष्ठ नागरिकांच्या पासदरात वाढ करून काय फायदा झाला?’’

‘‘पीएमपीत रुजू झाल्यापासून मुंढे सर्वकाही त्यांनीच केल्याचे सांगत आहेत. मग, इतरांनी काहीच केले नाही का? ठेकेदाराचा करार रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. उत्पन्नात घट झाली, त्याला जबाबदार कोण? असा अधिकारी देऊन राज्य सरकारने पुण्याचा सूड उगवला आहे,’’ अशी टीका अरविंद शिंदे यांनी केली.

आबा बागूल म्हणाले, ‘‘पीएमपीची सेवा महिन्यातून एकदा मोफत देण्याचा ठराव महापालिकेने मंजूर केला आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी करीत नाही. तूट कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना सुचविल्या तरी त्याची अंमलबजावणी का होत नाही? काही प्रमाणात खासगीकरण करा, जाहिरात फलकांचा लिलाव केला तर, उत्पन्न वाढेल, असे सुचविले तरी त्याकडे मुंढे काणाडोळा करतात.’’

दीपक मानकर म्हणाले, ‘‘पीएमपी म्हणजे कोणाची खासगी जहागिरी नाही. या संस्थेत १०-१५ वर्षे कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्यांना कायम केले जात नाही. कामगारांवर अन्याय करून त्यांना साध्य तरी काय करायचे आहे? पीएमपी ही गोरगरिबांसाठी आहे. तिचे सक्षमीकरण करण्यासाठी कामगारांना देशोधडीला लावून प्रवाशांवर दरवाढ का लादली जाते?’’ मुंढे यांची ही मनमानी सहन करणार नाही, त्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू.’’ 

विशाल तांबे म्हणाले, ‘‘पुणेकरांना चांगली सेवा देण्याच्या हेतूने चर्चा अपेक्षित असताना मात्र, मुंढे यांच्या उद्धटपणामुळे वेळ वाया गेला आहे. हा पुणेकरांचा अवमान आहे. अशा अधिकाऱ्यांमुळे पीएमपीचा फायदा नाही तर, नुकसान होण्याची भीती आहे.’’

‘‘महापालिकेच्या खास सभेतून अशा प्रकारे निघून जाणे म्हणजे, सभागृहाचा अवमान आहे. ही सभा घेण्याबाबत आग्रह केला पण, त्याचा उद्देश साध्य झाला नाही,’’ असे अविनाश बागवे यांनी सांगितले. धीरज घाटे यांनी दहशत पसरविण्यासाठी मुंढे हे करीत असलेल्या कामाचा निषेध केला. राजश्री शिळीमकर, नाना भानगिरे यांचीही भाषणे झाली. तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची बससेवा सुरळीत करण्यासाठी महेंद्र पठारे, संजिला पठारे, सुमन पठारे आणि भय्यासाहेब जाधव यांनी आंदोलन केले.

उत्पन्न कमी झाले 
प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘पीएमपीत सुधारणा झाल्याचा मुंढे यांचा दावा आहे. तो सिद्ध करण्यासाठी त्यांनी गेल्या तीन वर्षांतील प्रवासी संख्या, उत्पन्न आणि मार्गावरील बसच्या फेऱ्या यांचा अहवाल सादर करावा. पुणेकरच ठरवतील की मुंढे किती कार्यक्षम आहेत. कारण, उत्पन्न आणि प्रवासी संख्या या वर्षात कमी झाली आहे. ११० कंत्राटी कामगारांना नियुक्त करून त्यांना सहा महिन्यांचा १ कोटी ९६ लाख पगार आगाऊ का दिला? एसटीच्या अधिकाऱ्यांना नियुक्त केले; परंतु संचालक मंडळाची मंजुरी घेतली नाही. मनमानी पद्धतीने कंपनीचे कामकाज केले जाते अन्‌ महापालिकेतील सत्ताधारीही त्यांना घाबरतात, ही शरमेची बाब आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com