कराराचे उल्लंघन केल्यास बस कंत्राटदारांवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

पुणे - पीएमपीबरोबर केलेल्या करारानुसार खासगी कंत्राटदारांनी सुविधा पुरविल्या नाहीत, तर येत्या आठवड्यात कठोर कारवाई करण्याचे संकेत संस्थेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी दिले. बसच्या देखभाल दुरुस्तीबाबत कोणतीही कसूर खपवून घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पुणे - पीएमपीबरोबर केलेल्या करारानुसार खासगी कंत्राटदारांनी सुविधा पुरविल्या नाहीत, तर येत्या आठवड्यात कठोर कारवाई करण्याचे संकेत संस्थेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी दिले. बसच्या देखभाल दुरुस्तीबाबत कोणतीही कसूर खपवून घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पीेएमपीमध्ये 653 बस पाच कंत्राटदारांनी भाडेतत्त्वावर पुरविल्या आहेत. त्यापैकी 286 बस "महालक्ष्मी'च्या आहेत. सोमवारी अपघात झालेली बस याच कंत्राटदाराची आहे. पाच ठेकेदारांपैकी बीव्हीजे वगळता उर्वरित चार ठेकेदारांनी एकदाही 90 टक्के बस संख्या पुरविलेली नाही. त्यामुळे त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच महालक्ष्मीला 1 एप्रिल ते 30 सप्टेंबरदरम्यान थांब्यावर बस उभी केली नाही म्हणून सुमारे 9 कोटी रुपये दंड झाला आहे. त्यातील साडेपाच कोटींचा दंड त्यांनी भरला आहे. उर्वरित सुमारे साडेतीन कोटीचा दंड त्यांनी भरलेला नाही, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. याच ठेकेदाराला मदत म्हणून पीएमपीने चार महिन्यांत वेळोवेळी सुमारे तीन कोटींपेक्षा अधिक रकमेची उचल दिली आहे. त्यामुळे त्यांनीही पीएमपीबरोबर केलेल्या कराराची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. 

नव्या बस आठवड्यात 
पीएमपीच्या ताफ्यात नव्या 200 मिडी बस दाखल होण्याची प्रक्रिया आठवड्यात सुरू होणार आहे. पुणे महापालिकेने 120, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेने 80 बस खरेदीसाठी निधी दिला आहे. त्यासाठीची रक्कम दोन्ही महापालिकांनी दिली असून, आता बसची तपासणी सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

पीएमपीची खास सभा 
पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सद्यःस्थिती, तिची सेवा, उत्पन्न, खर्च आणि अडचणी याबाबत चर्चा करण्यासाठी खास सभा घेण्यात येणार असून, त्यानंतर उपाययोजनाही आखण्यात येणार आहेत. यासंदर्भातील निर्णयाला स्थायी समितीने मंजुरी दिली. या सभेतील पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्यासह पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी उपस्थित राहतील, असे प्रस्तावात म्हटले आहे. सभेची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.