"पोलिसकाकां'मुळे विद्यार्थ्यांना सुरक्षेची हमी 

"पोलिसकाकां'मुळे विद्यार्थ्यांना सुरक्षेची हमी 

"पोलिसकाका' हा शब्द तसा जुनाच; मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या या पोलिसकाकांचं महत्त्व आजही कायम आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी "पोलिसकाका' ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला. सध्या हा उपक्रम सहाशेहून अधिक शाळा-महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येत आहे. त्यासाठी 120 पोलिसकाकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालक आणि शिक्षकांना सुरक्षिततेची हमी मिळाली आहे. 

प्रसंग 1 
मुंढवा परिसरातील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी 8 ऑगस्ट रोजी पोलिस हवालदार पांडुरंग पवार यांना फोन केला. ते म्हणाले, ""दोन मुले वर्गातील मुलींना दमदाटी करत असून, ते कोणाचेही ऐकत नाहीत.'' त्यावर पवार यांनी तातडीने बीट मार्शलला कॉल केला. बीट मार्शल आणि पोलिस हवालदार महाविद्यालयात पोचले. त्यांनी प्राचार्यांची भेट घेतली. त्यानंतर त्या दोन विद्यार्थ्यांसह त्यांच्या आई-वडिलांना बोलावून घेतले. त्या मुलांना समज देऊन यापुढे चांगली वर्तणूक करण्याची हमी घेऊन त्यांना सोडले. या घटनेनंतर प्राचार्य आणि शिक्षकांनी पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांचे आभार मानले. पालकांनीही "पोलिसकाका' या संकल्पनेचे कौतुक केले. 

प्रसंग 2  
कर्वे रस्त्यावरील मुलींच्या महाविद्यालयासमोर एक सप्टेंबरच्या सायंकाळी अशीच एक घटना घडली. एका विद्यार्थिनीने "पोलिसकाकां'ना फोन केला. ती म्हणाली, ""मी महाविद्यालयासमोर उभी आहे. गेटजवळच दोन-तीन मुले उभी आहेत. ते माझ्याकडे बघून काहीतरी बोलत आहेत. मला तुमची मदत हवी आहे.'' यानंतर केवळ दहा मिनिटांच्या आत डेक्‍कन ठाण्यातील पोलिस त्या महाविद्यालयात पोचले. त्या विद्यार्थिनीने तिच्याकडे बघून बोलत असलेल्या मुलांकडे बोट दाखवले. पोलिसांनी त्या मुलांना बोलावून विचारणा केली. त्या वेळी त्या मुलांनी "आम्ही गप्पा मारत होतो. काहीतरी गैरसमज झाला असावा,' असे म्हणत माफी मागितली. 

शहरातील अनेक शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात मुलींच्या छेडछाडीच्या घटना घडत असतात; मात्र पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या "पोलिसकाका'या संकल्पनेमुळे विद्यार्थिनींची छेडछाड आणि विद्यार्थ्यांची आपापसांतील भांडणे रोखण्यात आता यश आले आहे. 

विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना  
शहरात संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसकाका शाळा-महाविद्यालयात जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांनाही काही अडचणी आहेत का, अशी विचारणा करत आहेत. तसेच खासगी संस्थांमध्येही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. पोलिसांच्या या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. 

विद्यार्थ्यांनो, थेट तक्रार करा 
प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शाळा-महाविद्यालयात आणि प्रवेशद्वारावर सूचना फलक लावण्यात आले आहेत. त्यामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांचा मोबाईल क्रमांक देण्यात आला आहे. कोणत्याही विद्यार्थी-विद्यार्थिनीला अडचण आल्यास या क्रमांकावर थेट तक्रार करता येईल. त्यासाठी पोलिस ठाण्यात जाण्याची गरज नाही. पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी संबंधित वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. 

साडी ओढणाऱ्याची हकालपट्टी  
मुंढवा परिसरात 12 सप्टेंबर रोजी इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने शाळेत नव्यानेच आलेल्या शिक्षिकेची साडी ओढली. या घटनेमुळे ती शिक्षिका घाबरली आहे, असे प्राचार्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसकाकांनी तातडीने महाविद्यालयात जाऊन त्या मुलाला प्राचार्यांच्या केबिनमध्ये आणले. तसेच त्याच्या पालकांना बोलावून घेतले. त्यानंतर त्या विद्यार्थ्याला महाविद्यालयातून काढण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com