कचऱ्याच्या आगीमुळे प्रदूषण

कचऱ्याच्या आगीमुळे प्रदूषण

पुणे - शहरात ठिकठिकाणी पेटवून देण्यात येणारा कचरा हे प्रदूषणाचे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. हडपसर भागात कचरा डेपोतील कचऱ्याला लागणाऱ्या आगीमुळे शहरातील इतर भागांच्या मानाने हडपसरमधील हवेची गुणवत्ता कमी असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

सोसायट्या आणि बंगल्यांच्या आवारात पालापाचोळा आणि इतर कचरा जाळण्याच्या घटना सर्रास घडत आहेत, पण त्यांच्या तक्रारीच येत नसल्याने कारवाई कोणावर करायची, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. फुरसुंगी आणि उरळी देवाची येथील कचरा डेपोसह शहरभर कचरा जाळला जात असल्याने मानवी आरोग्यास हानिकारक परिस्थिती निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे, महापालिकेनेच नेमलेले सफाई कामगार कचरा पेटवून देत असल्याचेही आढळून आले आहे. याकडे यंत्रणेचे लक्ष्य नसल्याने कामगारही अशाप्रकारे वागत असल्याचे महापालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले. सार्वजनिक ठिकाणी अशा घटना घडत असल्याची कल्पना महापालिका प्रशासनाला असली तरी, दोषींवर केवळ पाच-पन्नास रुपयांच्या दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जातो. ज्यामुळे संबंधितांना धाक राहिलेला नाही. 

शहरात रोज साधारणतः १ हजार ६०० टन कचरा जमा होतो. तो पूर्णपणे उचलण्यात येत असल्याचा दावा महापालिका करते. परंतु, काही भागातील कचरा उचलण्यात येत नाही. अशा ठिकाणांवरील कचरा जाळण्यात येतो. तर, काही जुन्या सोसायट्या आणि बंगल्यांच्या आवारातही तो जाळण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. शिवाय, हिवाळ्यामुळे रात्रीच्यावेळी शेकोट्याही पेटविल्या जातात. त्यामुळे निर्माण होणारा कार्बन डायऑक्‍साईड आणि कार्बन मोनॉक्‍साईड आरोग्याला हानिकारक ठरतो. 

प्लॅस्टिक जाळणे सर्वांत घातक
प्लॅस्टिक कचरा लवकर पेट घेत असल्याने तो जाळण्याच्या घटना वाढत आहेत. मात्र, हा कचरा सर्वाधिक घातक असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सल्फर डायऑक्‍साईड निर्माण होतो. ज्यामुळे मानवी आरोग्याला हानी पोचते. त्यामुळे घरोघरी जाऊन प्लॅस्टिक कचरा जमा करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारचा ‘ई-वेस्ट’ संकलित केला जातो. 

दिवसेंदिवस धुराचे लोट
आग लागण्याच्या सर्वाधिक घटना फुरसुंगी आणि उरळी देवाची येथील कचरा डेपोत घडल्या आहेत. त्यात गेल्या वर्षी म्हणजे, १४ एप्रिल रोजी लागलेली आग महिनाभर धुमसत होती. याआधी २०१२ मध्ये अशाप्रकारची आग लागल्याने या भागात सलग वीस दिवसांत धुराचे लोट उठत होते. शिवाय, अधूनमधून डेपो आणि आजूबाजूच्या परिसरातही आग लागते. ती आठ-आठ दिवस धुमसत राहिल्याचेही स्पष्ट झाले आहे.

जागृतीची गरज
बागेतील पालापाचोळा हे उत्तम सेंद्रिय खत असून ते झाडांच्या मुळाशी जमा केले तर झाडांना पोषकद्रव्ये मिळतात, मात्र त्याकडे डोळेझाक करून हा कचरा जाळला जातो आणि त्याचे कार्बनच्या धुरात रूपांतर केले जाते. याबाबत जनजागृती होण्याची गरज व्यक्त करण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com