दुर्ग अभ्यासक प्रमोद मांडे यांचे निधन 

दुर्ग अभ्यासक प्रमोद मांडे यांचे निधन 

पुणे - सहज-सोपे लेखन, प्रभावी व्याख्यान आणि भटकंतीचा छंद यातून नव्या पिढीत इतिहासाची गोडी वाढविणारे, गड-किल्ल्यांचे अभ्यासक प्रमोद मारुती मांडे (वय 63) यांचे दीर्घ आजारामुळे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना असा परिवार आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे खरे साक्षीदार असलेल्या सह्याद्रीच्या रांगांमधील गडकिल्ल्यांची भ्रमंती करून मांडे यांनी तरुणांना हा जाज्वल्य इतिहास प्रत्यक्ष दाखविण्याचे काम केले. मांडे यांनी तब्बल 40 वर्षे सह्याद्रीच्या रांगांमध्ये पायी भ्रमण केले. त्याबाबत लेखन केले. त्याचे छायाचित्रण केले. टाटा मोटर्समध्ये 22 वर्षे नोकरी केल्यानंतर केवळ छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा, गडकिल्ल्यांचा अभ्यास करता यावा यासाठी मांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. 

इतिहासाच्या ध्यासापोटी मांडे यांनी महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीतील दोन हजार किल्ले पाहिले. शिवाय, देशभरातील इतर प्रमुख किल्ल्यांनाही प्रत्यक्ष जाऊन भेटी दिल्या. त्यांच्याकडे 15 हजार पुस्तके, त्यासोबतच तीन हजार स्लाइड्‌स, गडकिल्ल्यांची व भटकंतीची असंख्य छायाचित्रे, 450 क्रांतिकारकांची दुर्मिळ छायाचित्रे व तैलचित्रे यांचा संग्रह होता. विशेष म्हणजे, राजगड ते आग्रा व आग्रा ते राजगड असा छत्रपती शिवाजी राजांनी सात राज्यातून केलेल्या तब्बल 6300 किलोमीटरच्या प्रवासमार्गावर मांडे यांनी दोन वेळा प्रवास केला. त्याचा अभ्यास व संशोधन करून या मार्गाचे छायाचित्रणही त्यांनी केले होते. 

मांडे यांची गड किल्ले महाराष्ट्राचे, सह्याद्रीतील रत्नभांडार, स्वातंत्र्य संग्रामातील समिधा, 111 क्रांतिकारकांचे संक्षिप्त चरित्र, अशी विविध पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पुणे व्हेंचर्स, श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, वडवानल प्रतिष्ठान, भारत इतिहास संशोधक मंडळ, लोकसेवा प्रतिष्ठान, गडकिल्ले सेवा समिती अशा विविध संस्थांच्या माध्यमातून ते शेवटपर्यंत कार्यरत होते. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना "दुर्ग महर्षी' अशी उपाधीही देण्यात आली. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com