उद्योजकांबद्दलची मानसिकता बदलायला हवी - प्रतापराव पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

जैन समाज हा अतिशय प्रगल्भ आहे. सामाजिक जाण असलेला आहे. वेगवेगळ्या उद्योगांत अग्रेसर आहे. हा समाज केवळ भारतात श्रीमंत आहे असे नाही, जगभरात श्रीमंत आहे आणि तितकाच दानशूरही आहे.
- प्रतापराव पवार, अध्यक्ष, सकाळ

पुणे - 'परदेशांतील कंपन्या मोठ्या झाल्या तर चालतात; पण आपला माणूस, मग तो कुठल्याही जाती-धर्माचा असो, तो मोठा होता कामा नये, अशी वृत्ती पूर्वीच्या आणि आत्ताच्याही सरकारमध्ये आहे, ती बदलायला हवी. याच्या जोडीलाच व्यापारी आणि श्रीमंत लोकांबद्दल समाजाच्या मनात असलेले गैरसमजही दूर व्हायला हवेत,'' अशी अपेक्षा "सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी रविवारी व्यक्त केली.

"जय आनंद ग्रुप'चा समाजभूषण पुरस्कार "जीतो पुणे'चे अध्यक्ष, उद्योजक विजय भंडारी यांना प्रतापराव पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी "जीतो अपॅक्‍स'चे शांतिलाल कवार, नगरसेविका मानसी देशपांडे, अनसूया चव्हाण, नगरसेवक प्रवीण चोरबेले, श्रीनाथ भिमाले, अभय छाजेड, "जय आनंद'चे अध्यक्ष पृथ्वीराज धोका उपस्थित होते.

पवार म्हणाले, 'सुझुकी', "ह्युंदाई'सारख्या परदेशी कंपन्या किंवा "ऍमेझॉन' मोठे झाले तर चालते; पण आपल्याकडचे "टाटा' किंवा "किर्लोस्कर' आपल्यालाच चालत नाहीत. सरकारी कंपन्यांमध्ये तोटा झाला तर सरकारला आणि समाजालाही चालतो; पण एखाद्या व्यवसायात अपयश आले तर लगेच टीका होते, ही वस्तुस्थिती आहे, ती बदलायला हवी. श्रीमंत व्यक्ती फारशा चांगल्या नसतात, व्यापारी लोक लबाड असतात, असा गैरसमज लोकांमध्ये आजही आहे; पण श्रीमंत व्यक्ती श्रीमंत कशा होतात, त्यासाठी त्यांनी किती कष्ट केले, किती धडपड केली, हे कोणी पाहत नाही. त्यामुळे व्यापारी आणि श्रीमंत लोकांबद्दलची समाजाची मानसिकता बदलणेही तितकेच गरजेचे आहे, त्यासाठी "जीतो'सारख्या संघटनांनी प्रयत्न करायला हवेत. प्रामाणिकपणे पैसे कमविणे हा गुन्हा नाही.''

कवार म्हणाले, 'दुःखीकष्टी लोकांच्या चेहऱ्यांवर जो हास्य फुलवू शकतो, त्यांना मदतीचा हात देऊ शकतो, ती व्यक्ती खऱ्या अर्थाने श्रेष्ठ असते. त्यामुळे अधिकाधिक गरजू लोकांना आपण मदतीचा हात द्यायला हवा, त्यांना पाठबळ द्यायला हवे.'' भंडारी म्हणाले, 'समाजभूषण पुरस्कारासाठी मी योग्य आहे की नाही, हे मला माहीत नाही; पण अजून पुष्कळ काम करायचे राहिले आहे. या कामासाठी मला वेगवेगळ्या स्तरांतून प्रेरणा मिळत आहे. हा क्षण माझ्यासाठी अधिक मोलाचा आहे.''