पुण्यातील 13 जणांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर 

पुण्यातील 13 जणांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर 

पुणे - स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी राज्य पोलिस दलातील एकूण 40 पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशंसनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले. त्यात पुणे शहर पोलिस दलातील उपायुक्त बाळशीराम गायकर, पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत, पिंपरीचे वरिष्ठ निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्यासह 13 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

पोलिस पदक प्राप्त अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे (कंसात पद आणि ठिकाण) : बाळशीराम गायकर (पोलिस उपायुक्त, मुख्यालय-1, पुणे शहर), डॉ. प्रभाकर बुधवंत (पोलिस अधीक्षक, पुणे लोहमार्ग), विवेक वसंत मुगळीकर (वरिष्ठ निरीक्षक, पिंपरी), राजकुमार दौलत माने (सहायक फौजदार, मोटार परिवहन विभाग, पुणे शहर), कैलास शंकर मोहोळ (सहायक फौजदार, सिंहगड पोलिस ठाणे), चंद्रकांत किसन रघतवान (सहायक फौजदार, वारजे), सुरेश रामचंद्र जगताप (सहायक फौजदार, वाहतूक शाखा), प्रकाश केशव लंघे (पोलिस हवालदार, कोरेगाव पार्क), पुणे ग्रामीण पोलिस दलातील सर्जेराव बाजीराव पाटील (पोलिस निरीक्षक, लोणीकंद), राज्य राखीव पोलिस बलातील प्रकाश पांडुरंग नाईक (सहायक फौजदार, गट- 1) आणि सदाशिव प्रभू शिंदे (सहायक फौजदार, गट-2). तसेच, राज्य कारागृह विभागातील गुणवत्ता सेवेबाबतचे सुधारसेवा पदक येरवडा खुले जिल्हा कारागृहातील तुरुंग अधिकारी प्रकाश बाबूराव उकरंडे आणि कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील पोलिस हवालदार रमेश परशुराम धुमाळ यांना जाहीर झाले आहे. 

गायकरांनी केला कौशल्यपूर्ण तपास 
उपायुक्‍त गायकर 1990 मध्ये पोलिस दलात उपअधीक्षक पदावर रुजू झाले. त्यांनी 28 वर्षांच्या कारकिर्दीत विविध गंभीर गुन्ह्यांचा कौशल्यपूर्ण तपास केला. त्यापैकी सहा गुन्ह्यांतील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. महाराष्ट्र पोलिस अकादमीत उपसंचालकपदी असताना प्रशासकीय कामकाज संगणकीय करण्यासाठी पुढाकार घेतला. हुंडाबळी आणि स्त्री अत्याचाराबाबत समाजात जनजागृती केली. त्यांना सेवा कालावधीत 20 प्रशस्तिपत्र मिळाली आहेत. पोलिस दलातील उत्तम सेवेबद्दल त्यांना यापूर्वी पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. 

बुधवंतांनी केले बंदोबस्ताचे नियोजन 
पोलिस अधीक्षक डॉ. बुधवंत हे 1992 मध्ये उपअधीक्षक पदावर रुजू झाले. त्यांनी नगर, कोल्हापूर, अमरावती, ठाणे, बार्शी, बीड, वाशीम, बुलडाणा आणि औरंगाबाद येथे कामकाज केले आहे. कोल्हापूर येथे "एक गाव, एक गणपती' अभिनव उपक्रम राबविला. विविध उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये पोलिस बंदोबस्ताचे योग्य नियोजन करण्यासोबतच विविध गुन्ह्यांचा कौशल्यपूर्ण तपास केला आहे. 

मुगळीकरांकडून बनावट पदवी रॅकेट उघड 
वरिष्ठ निरीक्षक डॉ. मुगळीकर यांनी नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात कार्यरत असताना दरोडा, चोऱ्या यासह विविध गुन्ह्यांचा कौशल्याने तपास केला. हिंगोली येथे बीईएमएस अभ्यासक्रमाचे बनावट पदवी देणारे रॅकेट उघडकीस आणले होते. सेलू येथील पतसंस्थेवरील दरोड्यातील आरोपींना अटक करून अडीच कोटींचे सोन्याचे दागिने जप्त केले होते. त्यांना यापूर्वी विशेष सेवा पदक आणि पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह पदाने गौरविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com