सर्वधर्म समभावाचे  दर्शन घडविणारा ‘कॅंटोन्मेंट’

सर्वधर्म समभावाचे  दर्शन घडविणारा ‘कॅंटोन्मेंट’

लष्कर म्हटले की पुणे कॅंटोन्मेंट. येथील लोकांचा धर्मही निराळाच. कारण येथे ख्रिश्‍चन, पारशी, ज्यू, जैन, मुस्लिम, शीख धर्मीय आणि तेलगू, मल्याळम भाषिक नागरिक राहतात. हिंदू धर्मीय नागरिकांची मंदिरे आहेतच. सार्वजनिक गणेशोत्सवही येथे साजरा होतो. अन्य धर्मीय नागरिक येथे गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकर्तापद भूषवितात. सण कोणत्याही धर्माचा असो; हमखास सर्वधर्मीय नागरिक एकत्र आल्याचे चित्र येथे पाहायला मिळते.

ब्रिटिशांनी पुणे कॅंटोन्मेंटची स्थापना केली आणि पूर्व भाग पश्‍चिम पुण्याशी जोडला गेला. त्यासोबत विविध धर्मीयांचे सण-उत्सव साजरे होऊ लागले. त्यांच्या धार्मिक स्थळांचीही निर्मिती झाली. रामनवमी, नाताळ, ताबूत स्थापना आदी विविध धर्माचे उत्सव येथे साजरे होतात तेव्हा विविधतेतील एकतेचे दर्शन घडते. सर्वधर्मीयांच्या वसाहती येथे आहेत. येथील ख्रिश्‍चन धर्मीयांपैकी रोमन कॅथॉलिक व प्रोटेस्टंट पंथीयांची चर्च; तसेच अन्य धर्मीयांची प्रार्थना स्थळेही शंभर वर्षे जुनी आहेत. डिसेंबर महिना सुरू झाला की नाताळचे वेध लागतात. तेव्हा संपूर्ण कॅम्प परिसर रोषणाईने उजळून निघतो. या परिसराचे सौंदर्य पाहावे तर नाताळमध्येच. सर्व चर्च विद्युत रोषणाईने सजवली जातात. आकाशदिवे, चांदण्या, दिव्यांनी चर्चचा संपूर्ण परिसर झगमगू लागतो.

कॅंटोन्मेंट परिसरात चर्च, अग्यारी, मशीद, दर्गा, मंदिरे पुष्कळ आहेत. एकमेकांच्या संस्कृतीची देवाण-घेवाण येथे आवर्जून होते. पेशव्यांच्या सैन्यात गोवा व मूळचे पोर्तुगीजचे असलेले ख्रिस्ती सैनिक होते. त्यामुळे सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात येथे चर्च बांधण्यास परवानगी दिल्याचे बुजुर्ग मंडळी सांगतात. तशा नोंदीही सरकार दफ्तरी आहेत. सेंट मेरी, सेंट पॉल, सेंट मॅथ्यूज, ओल्ड हॅम मेथडीस्ट, सेंट झेव्हीअर, सेंट ॲन या चर्चची शतकोत्तर परंपरा आहे.

बहुभाषक चर्च
ख्रिस्ती समाज बहुभाषक असल्याने येथे इंग्रजी, मराठी, मल्याळम, तमीळ, हिंदी, कन्नड भाषकांचीही चर्च आहेत. सेंट मेरी व सेंट पॉल चर्च साधारणतः १८२५ दरम्यान स्थापन झाले. १८९३ मध्ये सेंट मॅथ्यूज मराठी चर्च स्थापन झाले. या चर्चची वास्तुशैली वाखाणण्यासारखी आहे. संपूर्ण दगडी बांधकाम, आतमध्ये सुबक नक्षीदार रचना, लाकडावर केलेले कोरीव काम येथे पाहायला मिळते. १९७१ मध्ये मेथडीस्ट मराठी चर्च नव्याने बांधण्यात आले. येथे मराठी, इंग्रजी व कानडी भाषेत दैनंदिन उपासना होते. तिन्ही भाषेसाठी पास्टर (रेव्हरंड) नियुक्त केलेले आहेत.
 

मारुती मंदिर
वैष्णव बनिया मंदिर संस्थानचे हे मंदिर आहे. या मंदिराला शंभर वर्षांहून अधिक इतिहास आहे. खंडेलवाल व आगरवाल समाजाचे नागरिक मंदिराची देखभाल पाहत. मंदिरातच शिव आणि कृष्ण मंदिर आहे. येथे हनुमान जयंती, गोकुळाष्टमी साजरी होते. गुजराती भाषक नागरिक असोत की मराठी. सर्वच मंदिराच्या उत्सवात सहभागी होतात. पारशी नागरिकही श्रद्धेने येथे येतात. माजी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांनी या मंदिराला भेट दिली होती.

शितला देवी मंदिर
शंभर वर्षांहून अधिक जुने हे मंदिर आहे. याची बांधणी दाक्षिणात्य पद्धतीची आहे. मंदिराचे काम अत्यंत आकर्षक व कोरीव आहे. तमीळ भाषक नागरिकांनी मंदिराची स्थापना केली. तमीळ पंचांगानुसार तेथे धार्मिक सण-उत्सव होत असतात. नवरात्रोत्सव, मंदिराचा वार्षिकोत्सव, दीपावली, महाशिवरात्री येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. दीपोत्सवही असतोच. दररोज देवीला अभिषेक केला जातो. तमीळ भाषकांसमवेत सर्वधर्मीय नागरिक येथील उत्सवात सहभागी होतात. शितलादेवीची मूर्ती काळ्या पाषाणाची असून, शेजारीच महादेवाचे मंदिर आहे. येथे अन्नदानही केले जाते. सामाजिक जाणिवेतून मदतही मंदिरातर्फे करण्यात येते. देवीसमोर आलेल्या साड्या गरजूंना वाटण्यात येतात.

बाबाजान दर्गा
सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान. सूफी संत बाबाजान यांचा येथे दर्गा आहे. सद्‌गुरू शंकर महाराज त्यांना आई असे म्हणत. अवतार मेहेरबाबा यांनाही त्यांनी अनुग्रहित केले. बाबाजान यांना अरबी, इराणी, पुश्‍तू, फारशी, इंग्रजी या भाषा अवगत होत्या. त्यांचा जन्म बलुचिस्थानमध्ये झाल्याचे सांगतात. दर गुरुवारी भाविक दर्ग्यावर येऊन बाबाजानच्या कबरीचे दर्शन आवर्जून घेतात. दररोज येथे दुवा होते. बाबाजान यांची दुर्मिळ छायाचित्रेही येथे पाहायला मिळतात. दर्ग्याचा उरूसही भरतो. यंदा २६ जानेवारीला उरूस भरणार आहे. दरवर्षी उरसामध्ये सर्वधर्मीय नागरिक भंडाऱ्याचा आस्वाद घेतात. पारशी नागरिकांतर्फे या वर्षी दर्ग्याला तीन चांदीचे दरवाजेही बसविण्यात येणार आहेत.

श्रीराम मंदिर
कॅम्पातल्या महात्मा गांधी रस्त्यावर शंभर वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले श्रीराम मंदिर आहे. नामदेव शिंपी समाजाचे हे मंदिर असून, येथे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. रामनवमी, गोकुळाष्टमी, संत नामदेव पुण्यतिथी, आश्‍विन कार्तिक महिन्यात काकडा आरती आदी कार्यक्रम होतात. महिला भजनी मंडळातर्फेही येथे सेवा वाहण्यात येते. संत नामदेव गाथा पारायण, ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळाही होतो. मंदिरातील श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाच्या मूर्ती सुबक आहेत. वीस वर्षांपूर्वी नव्याने मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मंदिरात संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत नामदेव महाराजांच्याही मूर्ती आहेत. मंदिरात नक्षीकाम केलेले असून, सागवानी लाकडाची बांधणी आहे.
 

गुरुद्वारा गुरुनानक दरबार
लष्कर परिसरात शीख धर्मीयांचा गुरुद्वारा गुरुनानक दरबार आहे. या जागेला पूर्वी होलीवूड असे म्हटले जात. येथे वर्षभर दररोज लंगर सुरू असतो. दानशूर मंडळी स्वतःहून अन्नदानाची व्यवस्था करतात. विशेष म्हणजे गुरुनानक जयंतीनिमित्त प्रकाशोत्सव, बैसाखी उत्सव, गुरुगोविंदसिंग प्रकाश उत्सव, गुरुग्रंथसाहिब प्रकाशोत्सव आदी कार्यक्रमांत बहुसंख्येने भाविक सहभागी होतात. पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्‍मीर येथून कीर्तनकारांचे जथ्थे येथे येतात. गुरुद्वारातच त्यांच्या राहण्याची सोय करण्यात येते. गुरुद्वाराच्या वतीने परिसरात रुग्णालय सुरू करण्यात आले असून, त्याचाही लाभ अनेकांना होतो. शाळा, महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय सुरू करून शैक्षणिक क्षेत्रातही गुरुद्वाराच्या माध्यमातून शीख बांधव सामाजिक कार्यात सक्रिय असतात.

सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे
पुणे कॅंटोन्मेंटमध्ये फिरताना अन्य धर्मीयांच्या धार्मिक स्थळांनादेखील भेट द्यायला हवी. बाबाजान दर्गा, अवतार मेहेरबाबांचे घर, नामदेव शिंपी समाजाचे राम मंदिर, वैष्णव बनिया मंदिर संस्थानचे हनुमान मंदिर, तमीळ भाषकांचे शितला देवी मंदिर, शीख धर्मीयांचा गुरुद्वारा गुरुनानक दरबार, पारशी समाजाच्या सर जमशेटजी अग्यारी, कदमी अग्यारी, ज्यूंचे लाल देऊळ, ख्रिश्‍चन धर्मीयांचे सेंट मेरी चर्च, सेंट झेव्हीअर चर्च, ओल्डहॅम मेमोरिअल मेथॅडिस्ट चर्च, सेंट ॲन चर्च, पद्मशाली समाज देवी मंदिर, जैन धर्मीयांच्या तीर्थंकरांची मंदिरे आणि मुस्लिम धर्मीयांचे ताबूतही येथे बसतात. मंडळांतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवही साजरा केला जातो. (समाप्‍त)

जनता दरबार

'प्रश्‍न नागरिकांचे उत्तर अधिकाऱ्यांचे' या उपक्रमात पुणे 'महावितरण' कार्यालयासंदर्भातील आपले प्रश्‍न, अडचणी, शंका यांना 'महावितरण' चे वरिष्ठ अधिकारी 'सकाळ'च्या माध्यमातून उत्तर देणार आहेत. त्यासाठी वीजपुरवठा, वीज बिल किंवा या संदर्भातील आपले प्रश्‍न थोडक्‍यात आमच्याकडे 18 नोव्हेंबरपर्यंत पाठवावेत. प्रश्‍न थोडक्‍यात आणि नेमकेपणाने नमूद करावेत.
आपले प्रश्‍न 9921097482 या व्हॉट्‌स ऍप क्रमांकावर किंवा sakaljanatadarbar@esakal.com या ई-मेलवर पाठवा.

निवडक प्रश्‍न उत्तरासह 'सकाळ'मध्ये पुणे आवृत्तीत प्रसिद्ध होतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com