पुणे रेल्वे स्टेशनवरील "पार्सल विभाग' हलविणार? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

पुणे - एल्फिन्स्टन-परळी पादचारी पुलावरील दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर दिवाळीमध्ये वाढणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन पुणे रेल्वे स्टेशनवरील पार्सल विभाग घोरपडी येथे हलविण्याचा विचार सुरू आहे. जेणेकरून पादचारी पुलावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होऊन एकाच पुलावर येणारा ताण कमी होण्यास मदत होईल. 

या स्टेशनवर एकूण तीन पादचारी पूल आहेत. त्यापैकी सर्वांत जुना असलेल्या व दत्तमंदिराच्या जवळून जाणाऱ्या पादचारी पुलावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यातून कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपयोजना करण्यात येत आहे. यासंदर्भात पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी बुधवारी पत्रकारांना माहिती दिली. दिवाळीच्या सुटीत पर्यटन करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. मुंबईतील घटनेनंतर असा प्रकार घडू नये, यासाठी तातडीने उपाययोजना म्हणून पार्सल विभाग येथील पादचारी पुलाचा प्रवासी अधिकाधिक वापर कसा करतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पुलाच्या जवळील पार्सल विभाग घोरपडी येथे हलविण्याचा विचार सुरू आहे. जेणेकरून या पुलावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना कोणताही अडथळा न येता सोयीचे जावे. तसेच त्यासाठी रेल्वे पोलिसांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. त्यांच्या माध्यमातून गर्दीवर नियंत्रण करण्यात येणार आहे. 

नवीन पादचारी पुलाचे काम मार्गी लावणार 
जुन्या पादचारी पुलाच्या समांतर नवीन पादचारी पूल आणि त्यांना जोडणारा स्कायवॉक ही कामे मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून हे काम येत्या मार्चपर्यंत मार्गी लावण्याचे नियोजन आहे. त्यासाठी एक दिवस स्टेशनवरील रेल्वेगाड्यांची वाहतूक बंद ठेवण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती रेल्वे बोर्डाला करण्यात आली असल्याचेही देऊस्कर यांनी सांगितले.