सहकारी साखर कारखान्यांची वीज खरेदी करा - शरद पवार

सहकारी साखर कारखान्यांची वीज खरेदी करा - शरद पवार

पुणे - ‘‘सहकारी साखर कारखानदारांनी वीजप्रकल्प उभारावेत, असे आवाहन केंद्र सरकार करीत आहे. त्यासाठी अर्थसाह्य आणि वीजखरेदीची हमी देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे; परंतु कारखान्यांनी तयार केलेली वीज खरेदी करण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्याच्या भूमिकेत विरोधाभास आहे. जो गैरसमज असेल तो त्यांनी एकत्र बसून मिटविला पाहिजे,’’ असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले; तसेच राज्य सरकारने वीजखरेदी केलीच पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना पवार म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखर कारखानदारांनी सहप्रकल्प; तसेच विजेची गरज भागविण्यासाठी प्रकल्प उभारावेत अशी भूमिका मांडली आहे. राज्य सरकारनेही त्यासाठी अर्थसाह्य आणि वीजखरेदीची हमी देण्याचे धोरण आखले आहे; परंतु राज्याने कारखानदारांच्या वीजखरेदीस नकार दिल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये विरोधाभास असल्याचे दिसून येते. त्यामुळे सरकारने वीज खरेदी केलीच पाहिजे.’’

‘कुठल्याही परिस्थितीत इथेनॉल खरेदी केली जाणार नाही’, अशी भूमिका पेट्रोलियममंत्री बोलून दाखवितात; तर दुसरीकडे नितीन गडकरींसारखे ज्येष्ठ नेते त्याबाबत आग्रही भूमिका घेतात. इथेनॉलच्या दरांबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी. या प्रश्‍नांवर पंतप्रधान परदेशातून आल्यानंतर समक्ष भेटून सविस्तर चर्चा करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले

शेतीसाठी धरणातील पाणी बंदिस्त जलवाहिनीद्वारे देण्याच्या राज्य सरकारच्या हालचाली सुरू असल्याच्या प्रश्‍नावर पवार म्हणाले, ‘‘मुळात राज्यातील कालवे बुजवून बंदिस्त जलवाहिनी टाकणे हे अत्यंत खर्चिक आहे, व्यवहार्य नाही. वास्तविक पाहता ५० टक्के प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. त्यामुळे हे शक्‍य नाही.’’

नवीन साखर कारखाना काढू नका
ऊस हे मुख्य पीक नसतानाही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात साखर कारखाने काढले गेले आहेत. घटलेले उत्पादन क्षेत्र, उतारा आणि कारखानदारीवरील वाढता खर्च कायम असल्यामुळे साखर कारखानदारी आर्थिकदृष्ट्या धोक्‍यात आली आहे. तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश ही राज्ये ऊस उत्पादनात महाराष्ट्राच्या पुढे गेली आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत नवीन साखर कारखाने काढू नका, असा सल्ला शरद पवार यांनी दिला.
 

ऊस विकास आराखडा राबवा - पवार

कमी ऊस उत्पादन, कमी गाळपामुळे कमी मिळकत होते. परंतु, पगारावरील वाढता खर्च आणि कर्जाची परतफेड करावी लागत असल्याने साखर कारखानदारीचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे कारखान्यांनी भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ऊस विकास आराखडा गांभीर्याने राबविण्याची गरज असल्याचे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केले.

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे ‘ऊस विकास कृती कार्यक्रम’ या विषयावरील एक दिवसीय चर्चासत्राच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, महासंचालक शिवाजीराव देशमुख, आमदार अजित पवार, आ. जयंत पाटील, राजेश टोपे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘जागतिक ऊस उत्पादनात ब्राझीलनंतर भारताचा क्रमांक लागतो. तर देशात उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. आपली खरी स्पर्धा उत्तर प्रदेशाशी आहे. उत्तर प्रदेशातील साखरेला दिल्ली, हरियाना, पंजाबसोबत पश्‍चिम बंगाल, आसाम आणि ईशान्य भारतातील राज्ये ग्राहक आहेत. वाहतुकीचा खर्च जास्त असल्यामुळे महाराष्ट्रातील ऊस उत्पादकाला परवडत नाही.’’

दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील १० लाख हेक्‍टरचे ऊस क्षेत्र कमी झाले. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेनुसार ठिबकसिंचन करण्याच्या अटीवर ऊस उत्पादनाला परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यातील पाण्याच्या नियोजनात ठिबकचा अवलंब करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.

ऊस असो नसो, आमदारांना कारखाना लागतोच!
‘‘आमचे काही नेते आणि आमदार ऊस उत्पादन नसतानाही साखर कारखाने काढतात. माणसे सांभाळण्यासाठी आम्हीही मदत करतो. कारखाना काढू नका असा सल्ला देऊनही कोणी ऐकत नाही. मग आम्ही म्हणतो कारखाने काढा, पण पुढील समस्यांना तोंड द्या. बेसुमार कारखाने काढल्यामुळे आजचे दिवस आलेत,’’ असे सूचक विधान शरद पवार यांनी या वेळी केले. त्यानंतर उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ रंगला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com