स्वच्छतेत रेल्वे स्टेशनचा चेहरा-मोहरा बदलला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

पुणे - रेल्वे बोर्डाच्या पर्यावरण आणि स्वच्छता विभागाने धारेवर धरल्यानंतर रेल्वे प्रशासनाने राबविलेल्या मोहिमांमुळे स्वच्छतेबाबत पुणे रेल्वे स्टेशनचा चेहरा-मेहरा बदलला आहे. स्टेशनमध्ये चांगल्या प्रकारे स्वच्छता राखली जात असली, तरी भिकाऱ्यांचा प्रश्‍न कायम आहे.
रेल्वे मंत्रालयाने "स्वच्छ रेल, स्वच्छ भारत' अभियान सुरू केले आहे.

त्याअंतर्गत काही महिन्यांपूर्वी देशातील "ए-1' आणि "ए' दर्जाच्या स्टेशनच्या स्वच्छतेचा आढावा फेब्रुवारी व जुलै महिन्यात घेण्यात आला होता. देशात "ए-1' दर्जाची 75 व "ए' दर्जाची 332 स्टेशन आहेत.

फेब्रुवारी महिन्यात केलेल्या सर्व्हेमध्ये "ए-1' यादीत पुणे रेल्वे स्टेशनचा शेवटचा म्हणजेच 391 वा क्रमांक आला होता. जुलैमध्ये केलेल्या सर्व्हेमध्ये "ए-1' व "ए' दर्जाच्या स्टेशनमध्ये पुणे स्टेशनचा 75 वा क्रमांक आला होता. त्यामुळे पुणे स्टेशनच्या स्वच्छतेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते.

त्यानंतर पुणे विभागाच्या रेल्वे प्रशासनातर्फे पुणे स्टेशनवर स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना राबविल्या आल्या. अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पथकाची नेमणूक केली. दरम्यान, मध्यंतरी पुन्हा केलेल्या सर्व्हेमध्ये गेल्या सर्व्हेच्या तुलनेत पुणे स्टेशनची परिस्थिती काही प्रमाणात सुधारल्याचे चित्र होते. ही परिस्थिती सध्याही कायम असून, स्टेशनवरील साफसफाई रोजच्या रोज होत आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे डबे ठेवले आहेत. रेल्वे रुळावरील स्वच्छताही दररोज केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले; मात्र स्टेशनवरील भिकाऱ्यांचा प्रश्‍न कायम आहे. पादचारी पूल, तसेच सहा नंबरचा प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर भिकारी झोपल्याचे चित्र स्टेशनवर फेरफटका मारल्यानंतर दिसून आले.