पावसाचे कमबॅक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

पुणे - श्रावणात दडी मारलेल्या पावसाने रविवारी शहरात ‘कमबॅक’ केले. शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी दिवसभर बरसत होता. त्यामुळे पावसाळी रविवारचा पुणेकरांनी मनमुराद आनंद घेतला.

पुणे - श्रावणात दडी मारलेल्या पावसाने रविवारी शहरात ‘कमबॅक’ केले. शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी दिवसभर बरसत होता. त्यामुळे पावसाळी रविवारचा पुणेकरांनी मनमुराद आनंद घेतला.

शहरात गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. काही वेळा श्रावण सरींनी हजेरी लावली असली तरी त्यात जोर नव्हता. त्यामुळे पुणेकर फक्‍त ढगाळ वातावरण अनुभवत होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून किमान तापमानाचा पाराही सरासरीपेक्षा जास्त नोंदला गेला. उन्हाचा चटका वाढल्याने पंखे पुन्हा सुरू झाले होते. अशा वातावरणात शनिवारी सायंकाळपासून पावसाच्या हलक्‍या सरींना सुरवात झाली. रात्री या सरींचा जोर वाढला.

शनिवारी मध्यरात्रीपर्यंत २.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २९.४ मिलिमीटर पाऊस शहरात पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. पावसाचा जोर दुपारी दोन-अडीचच्या सुमारास वाढला होता. शहरातील रस्त्या-रस्त्यांवर पाणी वाहत होते. पावसाळी गटारेही भरून वाहत होती. काही ठिकाणी गटारांमधील पाणी रस्त्यांवर येत होते.

रविवार आणि पाऊस यामुळे शहरातील रस्त्यांवर सायंकाळी गर्दी कमी होती. सुटीच्या दिवशी पुणेकर खरेदीसाठी बाहेर पडतात. त्यामुळे शहराच्या मध्य वस्तीतील पेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते; पण सुटीचा दिवस असूनही पावसाने जोर धरल्याने रस्त्यावरील गर्दी कमी झाल्याचे चित्र दिसत होते.

पावसाळी पर्यटन
शहर आणि परिसरात बऱ्याच दिवसांनी पाऊस सुरू झाल्याने महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी सिंहगड, पानशेत, खडकवासला, मुळशी, पवना या ठिकाणी धाव घेतली. त्यामुळे या भागात तरुणांची मोठी गर्दी झाली होती.

विजेचा लपंडाव
शहरातील मध्य वस्तीच्या पेठांसह उपनगरांमध्येही विजेचा लपंडाव सुरू होता. रविवारी सकाळी गेलेली वीज दुपारी परत आली; पण त्यानंतर सायंकाळपर्यंत सातत्याने विजेची ये-जा सुरू होती.

४३ मिलिमीटर पाऊस
शहरात सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच १ जून ते २० ऑगस्ट दरम्यान ३८३.४ मिलिमीटर पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

शहर आणि परिसरातील पावसाचा अंदाज
२१ ऑगस्ट - थांबून-थांबून पावसाच्या सरी
२२ ते २४ ऑगस्ट - पावसाच्या काही सरी पडण्याची शक्‍यता
२५ ऑगस्ट - हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता

Web Title: pune news rain