उमड घुमड... घन गरजे...

उमड घुमड... घन गरजे...

पुणे - आषाढ, श्रावण, भाद्रपद (जुलै ते सप्टेंबर) या वर्षाऋतूत प्रचंड आशा, काहूर, भय व शृंगार अशा परस्परविरोधी अनेक भावनांचं नाट्यमय उद्दीपन घडतं. त्यामुळे हा ऋतू भारतीय शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत कलावंतांना मोहून घेणारा ठरतो. आजच्या आघाडीचे तरुण गायक पं. संजीव अभ्यंकर व सावनी शेंडे-साठ्ये या ऋतूशी संबंधित बंदिशी देश-परदेशात गाताना तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो, असं ते सांगतात.

अभ्यंकर म्हणाले, ‘‘पावसाळ्यात वातावरण अतिशय आल्हाददायक असताना शृंगाररस फुलतो. वादळी पाऊस व विजांचा कडकडाट असताना रौद्रसाची अभिव्यक्ती होते. पाऊस नको तेवढा होतो व त्यामुळे दूरदेशी अडकून पडलेल्या जीवलगाची भेट होत नाही तेव्हा विरहभावना मन व्यापून टाकते. हिरवाई फुलते व सर्वत्र ‘सुजलाम्‌ सफलाम्‌’ स्थिती निर्माण होते तेव्हा हर्षोल्हासाची गाणी प्रकटतात. या भावनांमधून बंदिशकारांना निरनिराळ्या आशयाच्या रचना सुचू लागतात. यातून मियाँ की मल्हार व मेघ यांसारखे राग जन्माला आले. मल्हारच्या प्रकारांमध्ये गौड, रामदासी, सूर, रामदासी, जयंत, धूलिया व नानक यांप्रमाणे चरजू की मल्हार हे प्रकार गायले जातात. यांचा वापर 
करून अनेक संगीतकारांनी नाटक व चित्रपटांसाठी गाणी रचलेली आहेत. याशिवाय इतर काही रागांमध्येही पावसाचं वर्णन उभं करणाऱ्या रचना आहेत. तरुणाईला या ऋतूशी संबंधित बंदिशी आवडतात.’’

सावनीनं सांगितलं, की उपशास्त्रीय संगीतामध्ये श्रावणात गायल्या जाणाऱ्या विशिष्ट रचना सावनी या नावानं ओळखल्या जातात. माझा जन्म श्रावणातला व घरात शास्त्रीय संगीताचं वातावरण म्हणून माझं नाव सावनी ठेवलं. श्रावण-भाद्रपदात झुला हा प्रकारही गायला जातो. लहान मुली व युवती झाडांच्या फांद्यावर झुला बांधून झोके घेतात. याप्रसंगी गायची अनेक गीतं लोकसंगीतात आहेत. त्याचा मिलाफ शास्त्रीय संगीतात होऊन झुलागीतं निर्माण झाली. त्यातील राधा-कृष्णाच्या मीलन व विरहाची पारंपरिक वर्णनं आजही रसिकांना भुरळ घालतात. बेगम अख्तर व शोभा गुर्टू यांच्यासारख्या नामांकित गायिकांमुळे ती मैफलींमध्ये लोकप्रिय झाली. या ऋतूत गायला जाणारा कजरी हा प्रकारही तरुणांना हवाहवासा वाटतो. ‘सावन की ऋतू आयी सजनी’, ‘घिर के आयी बदरिया’ व ‘बरसन लागी सावन की बूंदियाँ’ यांसारख्या रचनांची अवीट गोडी तरुणांना वारंवार अनुभवाविशी वाटते.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com