एकाच रांगोळीतून दोन भिन्न प्रतिमा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

पुणे - साधी रांगोळी, व्यक्तिचित्र, थ्रीडी, प्रतिबिंब आणि आता ‘टू इन वन’ प्रकारातील रांगोळी काढण्याचे संशोधनात्मक कौशल्य विकसित झाले आहे. ‘टू इन वन’ची ही किमया विकसित केली आहे, पुण्यातील अक्षय शहापूरकर यांनी. या रांगोळीप्रकारात दोन भिन्न प्रतिमा एकाच रांगोळीतून रेखाटले जातात. समोरून पाहताना काहीसी अस्पष्ट दिसणाऱ्या या रांगोळीत तिच्या विशिष्ट रचनेमुळे दोन वेगवेगळ्या प्रतिमांचे दर्शन घडते.

सण-समारंभामध्ये शुभचिन्हाचे प्रतीक मानली गेलेली रांगोळी अधिकाधिक विकसित होत गेली आहे. आजही अनेक घरांमध्ये रोज सकाळी नित्यनियमाने आणि मोठ्या आवडीने रांगोळी काढली जाते. महिला वर्गाबरोबरच तरूणांमध्येही कलात्मकतेने रांगोळी काढण्याबाबत उत्सुकता असते.

शहापूरकर म्हणाले,‘‘मी अभियांत्रिकीचा प्राध्यापक असून, श्रीरंग कलादर्पण संस्थेत रांगोळीचे प्रशिक्षणही देतो. साहजिकच रांगोळीबाबत माझ्या मनात एक वेगळे स्थान आहे. त्यातूनच रांगोळीत सतत नवनवीन प्रयोग करण्याचा माझा प्रयत्न आहे. आज ‘टू इन वन’ही कलाकृती पूर्ण झाल्याचा आनंद होत आहे.’’

यापुढेही रांगोळीत वेगवेगळे प्रयोग करणार असून ‘टू इन वन’साठी धातूचा (स्टील) प्लॅटफॉर्म बनवणार आहे. सोबतच जमिनीवर काढली जाणारी रांगोळी छतावर कशाप्रकारे काढता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लवकरच या रांगोळीचे भव्य प्रदर्शन सादर होणार आहे.

‘टू इन वन’ रांगोळीसाठी मी गेले तीन वर्षे संशोधन करीत होतो. यंत्र अभियांत्रिकीचे ज्ञान यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. एक विशिष्ट प्रकारचा प्लॅटफॉर्म तयार करण्यापासून, रांगोळीसाठी एक विशिष्ट रसायन करण्यापर्यंत अशा सर्वच बाबतीत बराच काळ अभ्यास करत होतो. यासाठी माझे सहकारी सुहास साळवी आणि जयंत गुरव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
- अक्षय शहापूरकर, रांगोळीकार

अशी आहे रांगोळी
 एका विशिष्ट प्लॅटफार्मवर एका बाजूने (तिरकस) पेन्सिल अथवा पेनच्या साह्याने चित्र काढले जाते.
 या चित्रावर पट्ट्यांच्या स्वरूपात रांगोळीची रचना केली जाते.
 या रांगोळीवर एक विशिष्ट स्वरूपाचे रसायन (सोल्युशन) फवारले जाते.
 रसायनामुळे ही रांगोळी स्थिर राहण्यास मदत मिळते.
 हीच प्रक्रिया दुसऱ्या बाजूनेही केली जाते.
 संपूर्ण रांगोळीसाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो.

Web Title: pune news rangoli