मुख्यमंत्र्यांना सांस्कृतिक जाण नाही - रावसाहेब कसबे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

भारत विविधतेने नटलेला देश आहे. ही विविधता टिकवणे गरजेचे आहे; पण या विरोधात काहीजण काम करत आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे दिल्ली विद्यापीठातून मराठी विषय रद्द करणे. या निर्णयाबद्दल "मसाप'ही दिल्ली विद्यापीठाचा निषेध करत आहे. 
- रावसाहेब कसबे, विचारवंत 

पुणे - ""यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर एकाही मुख्यमंत्र्यांनी सांस्कृतिक चळवळ वाढावी म्हणून प्रयत्न केले नाहीत. केवळ एका मुख्यमंत्र्यांकडे सांस्कृतिक जाण होती; पण तेही राजकारणात अडकले,'' अशा शब्दांत चव्हाण यांच्यानंतरच्या सर्व मुख्यमंत्र्यांवर ज्येष्ठ विचारवंत, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी टीका केली. सांस्कृतिक चळवळ वाढविण्यासाठी साहित्य संस्थांनीच पुढे यायला हवे, असेही ते म्हणाले. 

साहित्य परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सभा हसत-खेळत झाल्याचे पाहून "ही एखाद्या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे की स्नेहमेळावा' अशा शब्दांत कौतुक करत कसबे यांनी मराठी भाषा, साहित्य संस्थांची कर्तव्ये, कार्यकर्त्यांची आवश्‍यकता... अशा नानाविध विषयांवर मार्गदर्शन केले. परिषदेचे विश्‍वस्त उल्हास पवार, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्षा सुनीता राजेपवार उपस्थित होत्या. 

कसबे म्हणाले, ""सत्ता, पैसा या जोरावर कुठलीही संस्था चालत नाही. चांगले काम आणि समाजाचे पाठबळ सोबत असणे गरजेचे असते. परिषद याच दिशेने वाटचाल करत आहे. परिषदेचे कोणीही विरोधक नाहीत आणि आम्ही कोणाला परिषदेचे विरोधक मानतही नाही. परिषद ही साहित्य- सांस्कृतिक चळवळ वाढविण्यासाठी आहे.'' 

प्रत्येक जिल्ह्यात "बालकुमार संमेलन' 
""सध्या बालकुमारांसाठी कुठल्याही प्रकारचे प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे "मसाप'चे कार्यक्षेत्र असलेल्या सर्व जिल्ह्यांत बालकुमार संमेलन घेण्यात येणार आहे. त्यामुळे एका वर्षात 13 बालकुमार संमेलने होतील,'' असे प्रा. जोशी यांनी जाहीर केले. परिषदेतर्फे दुर्मिळ ग्रंथांच्या "डिजिटायझेशन'चे काम सुरू आहे. प्रमुख पदाधिकारी प्रत्येकी 10, तर कार्यकारिणीतील अन्य पदाधिकारी प्रत्येकी एका ग्रंथाच्या "डिजिटायझेशन'ची जबाबदारी घेणार आहेत, असे सांगून जोशी म्हणाले, ""परिषदेतर्फे दरवर्षी जीवनगौरव पुरस्काराबरोबरच अनेक पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार कोणाला दिले जावेत, हे यापुढे वाचकांनी आम्हाला कळवावे, तसे आवाहन वेगवेगळ्या माध्यमांतून करणार आहोत.''