सर्व जण मिळून शहराच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करूया - रश्‍मी शुक्‍ला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

पुणे - 'नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिस कटिबद्ध असून आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास शहर आणखी सुरक्षित होईल. आपण सर्व जण मिळून शहराच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करूया,'' असे आवाहन पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी केले.

पुणे - 'नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिस कटिबद्ध असून आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास शहर आणखी सुरक्षित होईल. आपण सर्व जण मिळून शहराच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करूया,'' असे आवाहन पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी केले.

शहरातील युवती-महिला, विद्यार्थ्यांसोबतच आता सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरू करण्यात आलेल्या "वुई मेक पुणे सिटी सेफ' या नवीन ऍपचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी पोलिस आयुक्‍त शुक्‍ला बोलत होत्या. शिवाजीनगर मुख्यालयात मंगळवारी आयोजित या कार्यक्रमास पोलिस सह आयुक्‍त रवींद्र कदम, विलू पूनावाला फौंडेशनच्या नताशा पूनावाला, वेंकीज इंडिया लि.चे जगदीश बालाजी राव, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, फिनोलेक्‍स कंपनीचे अनिल वाबी, अतिरिक्‍त आयुक्‍त (दक्षिण) रवींद्र सेनगावकर, अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रशासन) साहेबराव पाटील आदी उपस्थित होते.

शुक्‍ला म्हणाल्या, 'महिलांच्या सुरक्षेसाठी सर्व पोलिस ठाण्यांच्या पातळीवर "बडीकॉप' व्हॉटस्‌ऍप ग्रुप सुरू करण्यात आले आहेत. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी "पोलिसकाका' उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांचा नागरिकांना चांगला फायदा होत आहे. त्यामुळे आयटीसह नोकरदार महिला आणि विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. यानंतर आता सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी "वुई मेक पुणे सिटी सेफ' ऍप सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी त्याचा अधिकाधिक वापर करावा.''

या वेळी "सिस्का' कंपनीच्या वतीने पोलिस बीट मार्शल यांना दीडशे मोबाईलचे वितरण करण्यात आले. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी "बडीकॉप' आणि "पोलिसकाका'या उपक्रमांवर पथनाट्य सादर केले. पोलिस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ, पंकज डहाणे, बसवराज तेली, प्रवीण मुंढे, गणेश शिंदे, दीपक साकोरे, अशोक मोराळे, सहायक आयुक्‍त सुरेश भोसले यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी तसेच उपस्थित होते.

"सकाळ माध्यम समूहाचा' पुढाकार
शहराच्या सुरक्षेसाठी आपण सर्व जण प्रयत्न करत आहोत. पुणे पोलिसांच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांमध्ये "सकाळ माध्यम समूहाचा' मोठा पुढाकार आहे, असे पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी नमूद केले.