कृषी पदवी दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशाबाबत फेरविचार?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

पुणे - कृषी तंत्रज्ञान पदविकाधारकांना कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या (बीएस्सी ॲग्री) दुसऱ्या वर्षाला प्रवेश देण्याची पद्धत पुढील वर्षापासून बंद करण्याचा विचार महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद करीत आहे.

पदविकाधारकांना पदवीसाठी पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागत असून, त्यावरून गोंधळाची स्थिती निर्माण होत असल्याने हा विचार सुरू झाला आहे.

कृषी पदवी १६३ श्रेयांक भाराचा अभ्यासक्रम आहे. त्याच्या दुसऱ्या वर्षाला कृषी तंत्रज्ञान पदविकाधारकाला प्रवेश दिला जात असला, तरी पहिल्या वर्षाच्या सत्राचा २१ श्रेयांकाचा अभ्यासक्रम त्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी पूर्ण करावा लागतो. त्यासाठी नियमित अभ्यासक्रमापेक्षा अकरा पेपर अधिक द्यावे लागत असल्याने अभ्यासाचा ताण येत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. पदवीचे श्रेयांक बदलता येत नसल्याने या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करावाच लागेल, असे विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘नवीन अभ्यासक्रमानुसार पदवीचे श्रेयांक हे १८३ झाले आहेत. परंतु, पदविकाधारक विद्यार्थ्यांनी आधीच प्रवेश घेतल्याने त्यांना पहिल्या वर्षाच्या २१ श्रेयांकाचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. गेल्या वर्षी पदवीच्या तिसऱ्या आणि चौथ्या वर्षात हा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जात होता. परंतु, त्याचा ताण येत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केल्याने यंदा दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात हा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जाणार आहे.’’

गोंधळाची स्थिती
पदविकाधारक विद्यार्थ्यांना पदवीसाठी पहिल्या वर्षाचे अकरा विषय रद्द करून पदविकेच्या तीन वर्षांचे एकूण गुण ग्राह्य धरण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. याबाबत डॉ. रसाळ म्हणाले, ‘‘पदवीच्या पहिल्या वर्षाचे विषय आणि पदविकेचे विषय वेगळे आहेत, त्यामुळे दुसऱ्या वर्षाला प्रवेश दिला तरी ते पूर्ण करून घ्यावे लागतात. हे प्रवेश दिल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होत असल्याने पुढील वर्षी थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश देण्याबाबत फेरविचार करावा लागणार आहे.’’