प्लॅस्टिक पिशव्यांच्या पुनर्वापरातून विटा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

भूमिगत विद्युतवाहिन्या बनविण्यासाठी वापर; महापालिकेचा प्रकल्प

पुणे - दैनंदिन कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे प्रमाण जास्त असते. अविघटनशील असल्यामुळे प्लॅस्टिक वितळून किंवा प्रक्रिया करून त्याचे रूपांतर अन्य पदार्थांमध्ये करता येते. त्याच्या पिशव्यांच्या पुनर्वापरामधून भूमिगत विद्युतवाहिन्या (इलेक्‍ट्रॉनिक वायर) बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विटा तयार केल्या जातात. औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरामध्ये खासगी संस्था आणि महापालिकेच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे. 

औंध क्षेत्रीय कार्यालयाशेजारील कचरा हस्तांतर केंद्राशेजारी हा प्रकल्प आहे. एका खासगी ठेकेदाराकडून तो चालविला जात आहे. या ठिकाणी दररोज महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या कचरा वर्गीकरण केंद्रांमधून दररोज पिशव्या येतात. या पिशव्यांना स्वच्छ धुऊन त्याची भुकटी केली जाते.

त्यानंतर उच्च तापमानामध्ये वितळून त्याच्या छोट्या विटा तयार केल्या जातात. त्या विटा विजेच्या वायर तयार करणाऱ्या कंपन्यांना पुरवल्या जातात. या प्रकल्पामध्ये सुमारे १५ ते २० जण काम करतात. प्लॅस्टिक पिशव्यांच्या पुनर्वापरामुळे पर्यावरणपूरक विटा बनविण्याचा हा प्रकल्प महापालिकेकडून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून चालविला जात आहे. 

प्रकल्पाचे संचालक मन्सूर शेख म्हणाले, ‘‘महापालिकेकडून आम्हाला दररोज प्लॅस्टिकच्या पिशव्या व वस्तू दिल्या जातात. त्यावर प्रक्रिया करून उच्च तापमानावर वितळून त्यापासून विटा बनविल्या जातात. त्याचा वापर भूमिगत विद्युतवाहिन्या बनविण्यासाठी केला जातो. प्लॅस्टिक पिशव्यांच्या पुनर्वापरातून शाश्‍वत, आर्थिक फायदा देणारा पर्यावरणपूरक असा हा व्यवसाय आहे. यातून वीस ते तीस जणांना रोजगार मिळत आहे.’’

कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे प्रमाण ४० ते ६० टक्के असते. त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यावर अनेक ठिकाणी संशोधन सुरू आहे. पूर्वी हा कचरा जाळला जायचा; परंतु गेल्या काही वर्षांपासून आपण प्लॅस्टिक वितळून त्यातून विद्युतवाहिन्या बनविण्यासाठी विटा तयार करत आहेत. औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या शेजारी हा प्रकल्प सध्या सुरू आहे. दोन ते तीन टन प्लॅस्टिक पिशव्यांचा पुनर्वापर यामध्ये केला जात आहे.
- सुरेश जगताप, महापालिका सहआयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख